दोडामार्गात अवैध खनिज वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई
सिंधुदुर्गनगरी, - विना परवाना गौण खनिज वाहतूक करणारे पाच डंपर दोडामार्ग पोलिसांनी पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येकी 16 हजार रुपयांप्रमाणे पाच डंपर व्यावसायिकाकडुन 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला. स्थानिक राजकीय पदाधिकार्यांनी मात्र त्या कारवाईस विरोध दर्शवला.
या कारवाईबाबत पोलिस आणि महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोडामार्ग पोलीस पथकाने आज शुक्रवारी सकाळी पाच ते सहा या वेळेत दोडामार्ग पोलीस ठाण्यासमोर अनेक वाहनांची तपासणी केली. त्यात गौण खनिज वाहतूक करणारे डंपर आणि लाकूड वाहतूक करणारे ट्रक होते. त्यातल्या ट्रकचालकांकडे लाकूड वाहतूक परवाने होते. पण 5 डंपरमधल्या गौण खनिजासंदर्भात अनेक त्रुटी आढळल्या. चार डंपर गोवा पासिंगचे होते. त्यांच्याकडे महाराष्ट्र परवाना नव्हता. तसेच पाचही डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अ धिक गौणखनिज होते. त्यामुळे पोलिसांनी त्या गाड्या तहसीलदारांच्या ताब्यात दिल्या. त्यानंतर तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी त्या डंपरवर कारवाई केली. प्रत्येकाकडून 16 हजार रुपयांप्रमाणे 80 हजार रुपयांचा दंड केला.
दरम्यान, तालुक्यातील दारु अड्डे पूर्णपणे बंद करावे या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, जिल्हा उपाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, नगरसेवक दिवाकर गवस आणि संतोष म्हावळणकर आदी कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश जाधव,उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांची भेट घेतली आणि पोलिसांच्या अनागोंदी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दोडामार्ग तालुक्यात राजरोसपणे अवैध दारु विक्री आणि वाहतूक होते. आच्छादन न घालता गौणखनिज म्हणजेच काळे दगड वाहतूक होते. त्याकडे पोलीस लक्ष देत नाहीत. मात्र ट्रीपल सीटच्या नावाखाली सर्वसामान्यांना त्रास देतात असे सांगून स्थानिक राजकीय पदाधिकार्यांनी पोलीस कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.