Breaking News

लातूर येथे धनगर साहित्य संमेलन


ठाणे : महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धनगर समाज असून, समाजाला इतिहास, कला, नृत्य, ओव्या, साहित्य, संस्कृती अशी संपन्न आणि समृद्ध परंपरा आहे. मात्र, राज्यभरात विखुरलेल्या या समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळात एकही साहित्य संमेलन झालेले नाही. त्यामुळे समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांनी दिली. धनगर साहित्य परिषद आयोजित दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन लातूर येथे होत आहे. 9,10 व 11 फेब्रुवारी 2018 असे तीन दिवस वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद, पहिल्या दिवशी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी दिंडी, ओव्या, ढोल-ताशे याचे प्रदर्शन होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी या संमेलनाचे पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून 11 रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यीक कांचा इलाही यांच्या हस्ते समारोप होणार आहे.