Breaking News

भारतीय प्रजासत्ताक चिरंजीव व्हावे : शहा


कोपरगाव / प्रतिनिधी :- भारत हा आपला देश जगातील अत्यंत प्रभावी अशी लोकशाही असणारा देश आहे. या देशामध्ये विभिन्न जाती-धर्म व भाषा असूनही आपण सर्व एक आहोत. हिच सांस्कृतिक एकता आपली शक्ती आहे. त्यामुळेच भारतीय प्रजासत्ताक चिरंजीव व्हावे, असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसाटीचे ज्येष्ठ संचालक जवाहर शहा यांनी केले. 
येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित ६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते. या प्रजासत्ताकदिनी प्राचार्य डॉ. यादव म्हणाले, की भारताचे नागरिक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने व महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे. पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास भारत हा जगामध्ये एक सशक्त देश निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी महाविद्यालयाच्या गीत मंचाने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. एन. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्रसैनिक (मुले व मुली ) विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक पथसंचालन केले. महिला एन. सी. सी. विभागाच्या प्रमुख श्रीमती व्ही. एस. आहेर या उपस्थित होत्या. डॉ. झिया शेख यांनी दिलेल्या प्रशिक्षणानुसार महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाला, काठी, दांडपट्टा चालवणे, कराटे आदी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.