Breaking News

ग्रीन रिफायनरी विरोधात ’’स्वाभिमान’’चा एल्गार

सिंधुदुर्गनगरी - कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात तीव्र विरोध दर्शविण्याकरता गिर्ये येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत माजी खासदार निलेश राणे व देवगड- कणकवली- वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर चौफेर टीकास्त्र सोडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष रिफायनरी प्रकल्प हद्दपार होईपर्यंत कोकणी माणसाच्या सोबतीला राहील, अशी ग्वाही दिली.


छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून गिर्ये येथील रिफायनरी विरोधातील जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावरून बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, कोकणचा विकास आणि भवितव्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही़. ज्या शिवसेनेला कोकणी माणसाने भरभरून दिले त्याच कोकणी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनेने केले आहे़. जगातील सर्वांत मोठा रिफायनरी प्रकल्प कोकणी माणसाच्या माथी मारून शिवसेना काय साध्य करणार आहे? असा सवालही आमदार राणे यांनी उपस्थित केला. जर मुख्यमंत्री खोटे बोलत असतील तर खासदारांनी सिध्द करून दाखवावे़ जोपर्यंत नितेश राणे आमदार आहे तोपर्यंत रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचा एल्गार आ़ नितेश राणे यांनी जाहीर सभेत बोलताना केला.

नितेश राणे म्हणाले, ग्रीन रिफायनरी संदर्भात प्रकल्प क्षेत्रात जर अधिकारी आले तर ते आल्या पावलांनी घरी जाणार नाही़त. प्रकल्पग्रस्तांच्या माथी प्रकल्प लादू देणार नाही़ सभागृहात ज्यावेळी शिवसेनेचे आमदार या रिफायनरीला विरोध करतात़ त्यावेळी शिवसेनेचे उद्योगमंत्री का बोलत नाहीत? कोकणात जर खरोखरच तरूणांना रोजगार देणारा प्रकल्प आला असता तर विरोधाची सभा न घेता जाहीर सत्कार सभा घेतली असती़.
त्यानंतर माजी खासदार निलेश राणेंची रिफायनरी प्रकल्पविरोधात शिवसेनेवर तोफ धडकली. खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेत सर्वात जास्त दलाल असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक वेळी राणे कुटुंबीयांचे नाव घ्यायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची हाच शिवसेनेचा व्यवसाय आहे त्यामुळे आमच्या अंगावर कधी कुणी आल तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसनार नसल्याचा एल्गार राणे यांनी यावेळी केला.