Breaking News

सावंतवाडीत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा


सिंधुदुर्गनगरी,  - जातीपातीत विभाजन करून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने एकीचा नारा देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाजबांधवांनी भीमा कोरेगाव येथील जातीय दंगलींचा जाहीर निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरकडून प्रांत क ार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात शेकडो बहुजन बांधव सहभागी झाले होते. गोविंद गायकवाड अमर रहे, हम से जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा अशा घोषणा देत मोर्चेक-यांनी मनोहर ऊर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. संपूर्ण सावंतवाडी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देण्यात आले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भारतीय संविधान मानणा-या सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटना, पुरोगामी पक्ष, परिवर्तनवादी संघटना यांनी एकत्रित येत भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ सावंतवाडी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. सावंतवाडी बाजारपेठेतून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.