जिल्हास्तरीय निवडणूक विषयक वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन
जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेकरीता एकूण 14 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच निबंध स्पर्धेकरीता एकूण 14 स्पर्धक सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धेकरीता ‘नवमतदार आणि लोकशाही’ हा विषय तर निबंध स्पर्धेकरीता ’लोकशाही व युवा मतदारांची भुमिका’ असा विषय देण्यात आलेला होता. वत्कृत्व स्पर्धेकरीता स्पर्धकाची विषय मांडणी, हावभाव, आत्मविश्वास, आवश्यकतेनुसार आवाजातील चढउतार, प्रेक्षकांचा प्रतिसाद हे निकष विजेता ठरवितांना विचारात घेतले जाणार असल्याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, यावेळी उपस्थित स्पर्धक, शिक्षक आणि पालकांना दिली.
निवडणूक विषयक वत्कृत्व स्पर्धेकरीता सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी अत्यंत उत्साहाने, आवेशपूर्ण शैलीमध्ये ’नवमतदार आणि लोकशाही’ या विषयावर आपली मते मांडली. जिल्हास्तरावर पार पडलेल्या वत्कृत्व स्पर्धेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामधून प्रथम क्रमांक कु.शेळके वैशाली अर्जुन, राधाबाई काळे, कन्या विदयालय, कोळपेवाडी, कोपरगाव, व्दितीय क्रमांक कु. निमसे भावना ज्ञानेश्वर, शारदा कन्या विदयालय, राहाता, तृतीय क्रमांक कु.शेलार राजश्री रामदास, संत कदम माऊली विदयालय, पाथरे ता.राहूरी, उत्तेजनार्थ कु.पवार सौरव रामदास, न्यु इंग्लिश स्कूल,पारनेर, कु.कुलकर्णी ऋग्वेदा चंद्रशेखर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदनगर यांनी मिळविला.
वक्तृत्व स्पर्धेच्या महाविदयालयीन गटामध्ये कु.भरत मोहळकर, कु.प्रथमेश गरुड, कु.खुशी खंडाळे यांना उत्तेजनार्थ विजेते घोषित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेतील उच्च माध्यमिक गटांतील प्रथम 03 विजेत्यांचा राष्ट्रीय मतदार दिवसाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात येणार असून, गुरुवार दि.25 जानेवारी 2018 रोजीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपली वत्कृत्व कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.
उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित विदयार्थ्यांना आणि शिक्षकांना लोकशाही, मतदान, मतदार नोंदणी इत्यादींबाबत सांगोपांग मार्गदर्शन करुन, उपस्थित विदयार्थ्यांच्या वक्तृत्व कलेचे विशेषत्वाने कौतूक केले. निबंध स्पर्धेचा निकाल दि.22 जानेवारी 2018 रोजी जाहिर केला जाईल, तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांना देखील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या दि.25 जानेवारी 2018 रोजीच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याचे आनंदकर यांनी सांगितले.
या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे तसेच वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभय महाजन यांनी अभिनंदन केले. स्पर्धेच्या आयोजनाबाबत उपस्थित स्पर्धक, शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
वत्कृत्व स्पर्धेकरीता प्रा.श्री.विलास भारमळ, न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, शेवगाव, प्रा.श्री.दत्तात्रय नकुलवाड, न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड, सायन्स कॉलेज, अहमदनगर, श्रीमती.मनीषा गायकवाड, रुपीबाई मोतीलाल बोरा विदयालय, अहमदनगर यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीमती.माधुरी कांबळे, शिक्षण निरीक्षक, जिल्हा परिषद, अहमदनगर, नायब तहसिलदार श्री.प्रशांत गोसावी, श्री.राजेंद्र बेरड, अव्वल कारकून श्री.विशाल सदनापूर, लिपीक श्री.महेश आगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
