Breaking News

राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मागविणार- प्रा. राम शिंदे.

मुंबई : लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना इतर मागास वर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य मागास वर्ग आयोगाकडून अहवाल मागवून घेण्याचे निर्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले.


लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना इतर मागास वर्गाचे दाखले मिळण्यासंदर्भात आज मंत्रालयात प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यासह लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. लिंगायत समाजातील 12 पोटजातींचा समावेश इतर मागास वर्गात समावेश केला आहे. परंतु, हिंदू लिंगायत तसेच इतर अनेक पोटजातींचा समावेश त्यामध्ये न झाल्यामुळे दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याचे देशमुख व संघर्ष समितीच्या सदस्यांनी सांगितले. यावर प्रा. शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून यासंदर्भात अहवाल मागवून घेण्याचे व हा प्रश्‍न लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. यावेळी विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, सहसचिव भा.रा. गावित, विजाभज संचानालयाचे संचालक अहिरे आदी उपस्थित होते.