सरकारचे खरे लाभार्थी रामदेव बाबा : अशोक चव्हाण
औरंगाबाद : सरकारचे खरे लाभार्थी बेरोजगार तरुण आणि शेतकरी नसून रामदेव बाबा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, रामदेव बाबाच खरे सरकारचे लाभार्थी असून, पतंजलीला सरकारने 600 एकर जमीन देऊन सरकारी केंद्रातून पतंजलीचे उत्पादन विकण्यास परवानगी दिली.
सरकारला व्यापारी, शेतकरी, बेरोजगार यांच्या बद्दल काहीही देण घेण नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारला गांभीर्य नाही. मृत्यूनंतर सत्ताधारी नेते पूनर्मूल्यांकन करण्याचे जाहीर करतात यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते. काँग्रेस सत्तेवर असताना शेतमालाला दरवर्षी दहा ते बारा टक्के वाढीव बाजारभाव मिळत असे मात्र, भाजप सरकारने मागील तीन वर्षामध्ये केवळ दीड टक्के वाढ केली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारकडून फक्त जाहिरात बाजी केली जाते, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.