Breaking News

नाटक बदलत्या मूल्यांचे प्रभावी माध्यम : रामप्रकाश


संगमनेर प्रतिनिधी :- नाटक हा समाजाचा आरसा आहे. सामान्यांच्या अंतर्मनाचा वेध नाटकातून प्रदर्शित केला जातो. समाजातील वास्तवतेचे वर्णन जर साहित्यामध्ये केले नाही, तर इतिहास त्यांना माफ करणार नाही. मग साहित्यकारांना भावी पिढीला उत्तरे द्यावे लागतील. नाटक समाज परिवर्तनाचे तसेच बदलत्या मूल्यांचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे, असे उद्गगार आंध्रप्रदेश येथील तिरुपती विद्यापीठाचे प्रा. रामप्रकाश यांनी काढले.
येथील सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान आणि वाणिय महाविद्यालयात हिंदी विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहसचिव तुळशीनाथ भोर, लक्ष्मणराव कुटे, प्राचार्य आर. के. दातीर, उपप्राचार्य प्रा. नवले आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात ‘समकालीन हिंदी नाटक द्विधा में बदलते जीवन मूल्य’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आ. डॉ. तांबे, प्राचार्य डॉ. दातीर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी हिंदी विभागप्रमुख डॉ. शशी साळुंखे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन प्रा. सरला तुपे यांनी केले. या चर्चासत्रासाठी डॉ. एन.एस. परमार, प्रो. के.वी. नीनामी, प्रेमशंकर सिंह, डॉ. शहाबुध्दीन शेख, डॉ. गोकुळ क्षिरसागर, डॉ. ईश्‍वर पवार, डॉ. पी. व्ही. कोमटे, प्रा. शैलेश यादव, शिप्रादेवी आदींसह विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. दिपाश्री गडाख यांनी आभार मानले.