Breaking News

विजय चौगुले यांचा स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर

नवी मुंबई, दि. 20, जानेवारी - नगरसेवक विजय चौगुले यांचा वादग्रस्त ठरलेला स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा आज अखेर महासभेत मंजूर करण्यात आला. या वेळी चौगुले हे अनुपस्थित होते;मात्र चौगुले समर्थक नगरसेवक बहादुर बिस्ट,नवीन गवते व मनोज हळदणकर यांनी या राजीनामा पत्राला आक्षेप घेत, अशा प्रकारे राजीनामा मंजूर होवू शकत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. 


महापौर जयवंत सुतार यांनी विषय पत्रिकेवरील विजय चौगुले यांच्या राजीनाम्याचा विषय पुकारताच नगरसेवक बहादुर बिस्ट,नवीन गवते व मनोज हळदणकर यांनी या राजीनामा पत्राला आक्षेप घेतला. या प्रकरणी चौगुले यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सदर राजीनामा पत्रावरील सही स्वत:ची नसल्याचे म्हटले आहे. तसेच या पत्रावर जावक क्रमांक देखील नाही. यासाठी खोट्या लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हळदणकर यांनी केली. त्यावर जयवंत सुतार यांनी चौगुले यांनी राजीनाम पत्रावर घेतलेल्या आक्षेपात सही खोटी असल्याचा उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चौगुले यांच्याकडून महापौर कार्यालयात आलेल्या अनेक पत्रांना जावक क्रमांक नसल्याचे सांगत विरोधकांचा मुद्दा खोडून काढला. तसेच या बाबत सचिवांनी लेखी खुलासा दिला आहे. आयुक्तांनीही याबाबत अहवाल मागितला असल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांचे समाधान न झाल्याने चौगुले यांनी सचिव विभागाकडे केलेला पत्रव्यवहार वाचून दाखविण्यात आला. यामध्ये चौगुले यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे नमूद करून त्या जागेवर कोणाची नेमणूक करू नये किंवा त्या संबंधि कोणतीही कार्यवाही करू नये, असे म्हटले आहे. तसेच या तथाकथित राजीनाम्याची माहिती मिळावी अशी मागणी या पत्रात केली आहे.