मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला आली अवकळा अधिकारी कर्मचाऱ्यांची अनास्था
येथील तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे दि. ३० सप्टेंबर २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१४ रोजी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सदर इमारतीचा उद्धाटन झाले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, नागरी सुविधा केंद्र यासारखी शासकीय कार्यालये असल्याने रोज शेकडो लोक कामानिमित्त या कार्यालयात येत असतात. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना पाणी पिण्यासाठी असणाऱ्या वॉटर कुलरची अत्यंत दुर्दशा झाली आहे. वॉटर कुलर शेजारीच स्वच्छतागृह व शौचालय असून तेथेही अस्वच्छता आहे. थुंकल्यास ५०० रुपये दंड होईल, असे लिहिलेल्या ठिकाणीच थुंकून भिंती विद्रुप केल्या जात आहेत. इमारतीत अनेक जाळ्या लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान चालू केलेले असताना शासकीय कार्यालयेच स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातीवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे स्वच्छता अभियान बासनात गुंडाळून ठेवले जात आहे.
