Breaking News

सांसद आदर्शग्राम योजना बंद करण्याची मागणी करणार - खा. वंदना चव्हाण

पुणे,  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदारांना सांसद आदर्शग्राम म्हणून गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या सूचनेनुसार दौंड तालुक्यातील खोर हे गाव दत्तक घेतले आहे. परंतु दीड वर्ष झाले तरी गावच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यानेच मी येत्या संसदीय अधिवेशनात सांसद आदर्शग्राम योजना बंद करण्याची मागणी करणार असल्याचे मत राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

चव्हाण म्हणाल्या, आदर्शग्राम योजनेस प्रशासनाकडून मदत मिळत नसल्यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. त्यानंतर त्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना खोर येथील सांसद आदर्शग्राम योजने संदर्भात 1 महिन्याच्या आत मिटिंग घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला 1 महिना उलटून गेला तरी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित आदेशान्वये अद्यापही मिटिंग घेतलेली नसल्याचे सांगत त्यांनी ही योजना बंद करण्याची मागणी करणार असल्याचे मत व्यक्त केले.
वंदना चव्हाण यांनी सांसद आदर्शग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या खोर येथे खासदार निधीतून 35 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन आणि गावात, वाड्या-वस्त्यांवर बस विलेल्या 24 लाख रुपयांच्या 100 सौर दिव्यांचे उद्घाटन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.


चव्हाण पुढे म्हणाल्या, की स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावच्या विकासात गावे स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गावच्या विकासात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. महिला पुढे आल्या तर गावचा विकास शक्य आहे. महिलांमुळे गावाची व समाजाची प्रगती होऊ शकते. मी दत्तक घेतलेल्या गावच्या विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न क रणार असल्याचे मत यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केले.