Breaking News

पाणीपट्टी दरवाढी पाठोपाठ आता पाणीपुरवठा लाभ करातही दुप्पट वाढ

पुणे, दि. 28, जानेवारी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापाठोपाठ आता पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. पाणीपुरवठा लाभ करात वाढ केल्यास वार्षिक सुमारे 30 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढेल, असा अंदाज आहे.


अमृत योजनेअंतर्गत शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून 300 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी सिंचन पुनर्स्थापना खर्च 236 कोटी तसेच पुनर्वसन खर्च 70 कोटी रूपये सरकारकडे जमा करण्यात येणार आहे. या दोन्ही धरणातील पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 500 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भविष्यात 806 कोटीचा बोजा पडणार आहे. महापालिकेवर पडणारा हा बोजा काही प्रमाणात भरून येण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा लाभ करामध्ये दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.31) होणा-या स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.