दलितविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी एकजूट हवी : नवाब मलिक
पुणे : दलित राजकारण करताना व्यापक दृष्टिकोन ठेऊन एका बिंदुवर एकत्र या आणि दलितविरोधी शक्तिंविरोधात लढा द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज् सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात सहाव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘राजकीय पक्ष आणि दलित राजकारण’ या विषयावर आयोजित परिसंवादात मलिक बोलत होते. साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अजित अभ्यंकर हे सहभागी झाले होते. मलिक म्हणाले, केवळ बौध्दच नव्हे तर अन्य घटकही दलित समाजात मोडतात. त्यामुळे वेगवेगळ्या जातीचे लोक आंबेडकरी विचारधारेत आहेत. यासर्वांना एकत्रित करण्याची गरज आहे. या आधारावर कांशीराम यांनी सर्व समाज घटकांना एकत्रित आणून उत्तर प्रदेशात जे घडवून आणले ते महाराष्ट्रात शक्य आहे.
विश्वंभर चौधरी म्हणाले, दलित राजकारणाने अर्थकारणाला प्राधान्य दिले पाहिजे. सद्यस्थितीत दलित राजकारणाला मध्यवर्ती भूमिका घेवून पुरोगामी घटकांना एकत्रित करून मध्यममार्ग काढावा लागेल. भाजपचा समरसतेच्या नावाखाली दलितांना केवळ बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाबासाहेबांची प्रतिमा वापरून अनेक मिथके तयार केली जात आहेत. याकरिता रिपब्लिकन ऐक्याला पर्याय नाही.