Breaking News

यशवंतराव ते यशवंतराव एका प्रतिभेच्या वारसदाराचा अस्सल प्रवास


राजकारणात राहूनही आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र प्रभाव जनमानसात रुजवणार्‍या स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या स्वयंघोषीत वारसदारांची महाराष्ट्रात वानवा नाही. मुळात कै. यशवंतरावांशी येनकेनप्रकारे संबंध जोडून आपली लहान प्रतिमा भव्य करण्याचा प्रयत्न अनेक राजकारणी करताना दिसतात. अर्थात तो स्वप्रतिमा संवर्धनाचा मिथ्या खटाटोप असल्याचे लपून रहात नाही. परंतू कै. यशवंतरावांनंतर ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी खर्‍या अर्थाने हा वारसा टिकवून ठेवला. तद्नंतर कोण तर हा प्रवाह कै. यशवंतराव यांचे सर्वार्थाने शिष्य शोभणार्‍या ज्येष्ठ नेते श्री. यशवंतराव गडाख यांच्या प्रतिमा व प्रतिभाकर्तृत्वाजवळ येऊन थांबतो. 
कै. चव्हाण यांचे स्वतंत्र स्थानांकन तयार होण्यास त्यांची साहित्य, कला, नाट्य संस्कृती या क्षेत्रातील सहजसुंदर मुशाफिरी व संवेदनशिल प्रतिभेने प्रसवलेल्या साहित्यकृतींचा मोठा वाटा आहे. नेमक्या याच गोष्टी यशवंतराव गडाख यांच्या व्यक्तित्वात ठळकपणे दिसतात. एका लेखात श्री. गडाख म्हणतात, आज चव्हाणसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे, याचा सार्थ अभिमान मला आहे, यावरुन श्री. गडाख यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांचा प्रतिभासंपन्न वैचारिक वारसा स्वमाध्यमाने पुढच्या पिढीत कसा संक्रमीत केला याचा प्रत्यय येतो. 

काही छोटया अनुभवातूनही माणसाचे मोठेपण कळते. प्राथमिक शिक्षणाचे वास्तव दाखवणार्‍या माझ्या सारांश शून्य या कादंबरीचे प्रकाशन होते. गडाखसाहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांचा शिक्षण व शिक्षक यांच्याशी जवळून संबंध आला होता, शिवाय मुळा एज्यूकेशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा गरजूंपर्यंत पोहचवली होती. ते या विषयावर अधिकारवाणीनं बोलू शकत होते. मी मित्रांबरोबर निमंत्रण द्यायला गेलो, तेव्हा समारंभासाठी येणार्‍या सर्व साहित्यिकांना जेवायला माझ्या घरी घेऊन या असा आग्रह त्यांनी केला, आलेल्या साहित्यिकांची त्यांनी आस्थेनं सरबराई केली. प्रकाशन समारंभात भाषण करताना ते म्हणाले की, हे पुस्तक मी प्रवासातच वाचून संपवले. आधी मराठी शाळांना जीवन शिक्षण मंदिर असे नाव होते, ते बदलून जिल्हा परिषद असे झाले तेव्हापासूनच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे सुरु झाले, नंतर पान नंबरसहित ते तपशिल सांगू लागले, तेव्हा सभागृह अवाक् झाले. एखाद्या प्रकाशनसमारंभाला जाताना संबधित पुस्तक किती सुक्ष्मपणे वाचावे, याचा वस्तुपाठच त्यांनी इतरांना घालून दिला, कारण निमंत्रीत साहित्यिकांनी पुस्तकाचे एकही पान वाचायला वेळ मिळाला नसल्याचे नंतर खासगीत सांगितले. कै. चव्हाण यांच्या भाषणात अखंड वाचन व चिंतनाने जो आत्मविश्‍वास, भाषा सौंदर्य, वस्तुनिष्ठ ओघ व वैचारिक ठामपणा दिसायचा अगदी तशीच लय श्री. यशवंतराव गडाख यांच्या भाषणात आढळते. बोलण्याच्या ओघात मोत्याप्रमाणे त्यांच्या तोंडून असे काही शब्द ओघळून जातात, जी कागदावर नाही तर मनःपटलावर जतन करुन ठेवावीत. ती विधाने कुठल्याही ग्रंथसंपदेत सापडत नाहीत. वाचनाच्या अखंड मंथनाने बाहेर पडलेले ते अमृत असते. कै. राजीव राजळे यांना श्रध्दांजली वाहताना त्यांनी वापरलेले हा तरुण आमच्यासारख्या नेत्यांना पेलवला नाही. पक्षाला पेलवला नाही. अन् मतदारांनाही पेलवला नाही, हे विधान कै. राजीव यांच्या कार्यकर्तृत्वावर अचूक भाष्य करणारे ठरते. 

श्री. यशवंतराव गडाख यांच्या वाचनाच्या झपाटलेपणाचा अनुभव मी घेतला आहे. जयवंत दळवी यांच्या कादंबर्‍यांचा विवेचक अभ्यास या प्रबंधावरील दुःखाचे स्वगत हे पुस्तक मी त्यांना एका कार्यक्रमादरम्यान भेट दिले. दुसरा दिवस उलटत नाही तर त्यांचा फोन आला. पुस्तक वाचले, अभ्यासपुर्ण लिहिले आहे. माझा ऊर भरुन आला. तितकेच नवलही वाटले, ते चारशे पानाचे लठ्ठ् पुस्तक ज्यात प्रबंध म्हणून अनेक क्लिष्ट प्रकरणे होती. अशा पुस्तकाचा त्यांनी दोन दिवसात फडशा पाडला होता, पुढे ते म्हणाले, दळवींची कुठली पुस्तके वाचली पाहिजेत. यादी द्या, मी नऊदहा निवडक पुस्तकांची नावे दिली. अर्ध्या तासाने त्यांच्या खासगी सचिवांचा फोन आला, मी पुस्तकांच्या दुकानात आहे. पाच पुस्तके मिळाली, चार मिळाली नाहीत. पुण्यावरुन मागवायला सांगितली आहेत. 
यशवंतराव गडाख यांच्या अखंड वाचन, बहुश्रूतता, साहित्यिक व कलावंतांचा सहवास, दिर्घकालीन राजकिय अनुभूती या मिश्रणाने तयार झालेल्या, प्रगल्भ व चिंतनशील मनाच्या गाभार्‍यातून उमटलेलं जीवनभाष्य अनुभवयाला मिळणं म्हणजे, पिठूर चांदण्याच्या शितल प्रकाशात न्हाऊन निघाल्याचा आनंद देणारं ठरतं, कारण त्यांनी पुस्तके वाचली त्यापेक्षा अधिक माणसं वाचली. राजकारणात तर सारे मुखवटे लावूनच वावरतात. खरा चेहरा ओळखणे महाकठीण. ओळखता आला तरी त्यांच्यात सरडयापेक्षाही वेगानं रंग बदलण्याचे कौशल्य असतं. पण त्यांच्या पारखी नजरेनं माणसंही अचूक ओळखली. राजकारणात मित्र ही संकल्पनाच लागू पडत नाही, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच माणूस या शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात, माझ्या मते आपण माणूस जाणून घेण्यासाठी वाचन करतो. साहित्यनिर्मितीला जवळ करतो. माणसाचं निसर्गाशी असणारं नातं, समाजाशी असणारं नातं आणि त्याचं स्वतःचं त्याच्या अंतर्मनाशी असलेलं नातं जाणलं की माणूस समजून घेता येतो. 

माणसं समजावून घेण्याच्या या प्रक्रियेमुळेच श्री. गडाख सामाजिक वेदनेशी तादात्म्य पावतात. त्यावर उपायांचा विचार करतात. अशा सामाजिक भानाबरोबरच त्यांचे जागृत स्वभान समाजाला आत्मभान देण्याचा प्रयत्न करताना दिसते. राजकारणात कुठे थांबावे ते त्यांना निश्‍चित थांब्यावर उमगले. सत्तेपासून दूर असणार्‍या बहुतेक राजकारण्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होते, पण जीवन एकसूरी जगू नये, यावर विश्‍वास असणार्‍या श्री. यशवंतराव यांच्या सर्वांग सुंदर व्यक्तित्वावर सत्ता असल्या_ नसल्याचा परिणाम दिसत नाही. ते स्वतःच प्रांजळपणे सांगतात, राजकारणात आपल्या हाती काही नसतं. जे मिळेल त्यात समाधान मानायचं, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे राजकारणातल्या सत्तेची मी काळजी करत नाही. जेव्हा सत्ता मिळायची तेव्हा कुणी कितीही विरोध केला तरी मिळते, जेव्हा मिळायचीच नसते तेव्हा ऐनवेळी यादीतून नाव वगळलं जातं, मी दैववादी नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे. 

या वाक्याचा निटसा अर्थ राजकिय लोकांनी समजावून घेतला तर सध्या सत्तेसाठी सूरू असलेला टोकाचा आटापिटा बराचसा कमी होऊन पुढार्‍यांमध्ये परस्परातील हेवेदावे, द्वेष, तिरस्कार कमी होईल. 
वयाची पंच्याहत्तरी आणि राजकारणाची पन्नाशी! मावळतीच्या छटा पसरलेला श्री. यशवंतरावांचा चेहरा निर्वाज्य दिसतो. पण मनात चिंतन आणि नव्या पिढीविषयीची चिंता आहे. जी बोलण्यातून, लिहिण्यातून व्यक्त होते. राजकारण नितीमान नसतं, हे गृहित धरलं तरी त्याची एव्हढी कोसळ पाहून ते म्हणतात, मला रात्र रात्र झोप येत नाही. त्यांच हे व्यथित व्यक्त होणं सध्याच्या राजकिय अवस्थेवर नेमकं भाष्य करतं. विरोधक परस्परांना शत्रु समजतात. एकमेकांच्या जीवावर उठतात, विजयी होतो तो अर्निबंध वागतो, पराभव स्विकारण्याची मानसिकता क्षीण होत चालली आहे, निकोप स्वच्छ राजकारणाचं बरबटलेलं रूपांतर लोकशाहीला मारक ठरत आहे. याच्या वेदना सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून व्यापक राजकारण केलेल्या यशवंतराव गडाख यांच्यासारख्या बहुआयामी सुसंस्कृत नेत्याला होणं साहजिक आहे. \

राजकारण, सत्तासंघर्षापालिकडे जगात सुंदर खूप काही आहे, पुढार्‍यांभोवतालची गर्दी त्यांच्या भोवतालची वाटते. पण ती त्यांच्या अहष्य सत्तेची अधिकारांची किमया असते. कुणाचीही सत्ता अबाधीत नसते. सत्ता गेली की गर्दी फुंकर दिल्यासारखी पांगते. मग तो राजकारणी सेंट हेलेना बेटावर ठेवलेल्या पराभूत नेपोलियनसारखा एकाकी पडतो. जनात असूनही निर्जनस्थळी पडल्यासारखा. पण मनाला प्रामाणिक साथ देणारी असंख्य पुस्तके, काळ अंधारु लागला तरी नव्या रोपांना फुटणारे लसलशीत कोंब. नवनिर्मितीची साक्ष देणारी कोवळी पाने, राजकारण, माणसं बिघडली पण निसर्ग शाबूत आहे, तो माणसाला नवी उभारी देत राहतो. पुस्तके जीवनद्रव्य देतात, अन् माणूस निसर्गासारखा टवटवीत राहतो, समस्त राजकारण्यांनो असे जगून पहा. मावळतीचा सूर्यही आसमंतात लोभस रंगांची पखरण करतोच ना... यशवंतरावांच्या मनातील व्यक्त-अव्यक्त होणं काहिसं असंच असेल. 
नगरच्या बंगल्यावर असलेले साहेब सकाळी शिदोरी बांधून घेतात. ड्रायव्हर गाडी काढतो. सोनईच्या जन्ममातीकडे गाडी निघते. रुपडे बदललेली कौतीकी नदी मनात खळखळत असते. हिरवीकंच झाडी सळसळत जणू आपल्या पोशींद्याची वाट पहात असतात. रात्रीच्या कळया फुलून टवटवीतपणे स्वागताला तयार असतात. कुबेराच्या धनाचे मोल असलेला आमराईतील असंख्य पुस्तकांचा संग्रह जणू साहेबांची वाट पहात असतो. 
वाचनासाठी त्या गर्द निसर्गात छोटीशी कुटी आहे. सारं विसरुन साहेब अखंड वाचत राहतात. पुस्तकांशी अनामिक आपूलकीचा संवाद सुरु रहातो. वाचनाच्या मशागतीनं मनाची शेती नवविचारांच्या पिकानं बहरत जाते. त्यातून अर्धविराम, माझे संचित, सहवास अशा सकस साहित्यकृतींचे कोंब जन्मास येतात. या मनीचे त्या मनी संक्रमित व्हावे व त्यातून विझलेपण येत चाललेल्या समाजात नवचैतन्य फुलावे एवढाच ध्यास असतो. ते वाचतात, बोलतात, लिहितात आजच्या पिढीला यशवंतराव गडाख यांच्या रूपाने पुन्हा कै. यशवंतराव चव्हाण भेटल्याचा निर्भळ आनंद मिळत राहतो. 

डॉ. संजय कळमकर,
संकलन: सुधाकर होंडे पाटील 
नेवासा तालुका प्रतिनिधी