Breaking News

अगोदर विकासकामे करा नंतर पोस्टरबाजी करा : आढाव


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- शहरातील गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका या रस्त्याचे काम पावसाळ्यापासून रखडलेले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, बैल बाजार, व्यापारी वसाहत व परीसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाबद्दल सोशल मिडीयाच्या व वृत्तपत्रांच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी अपयश झाकण्यासाठी व नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या रत्याच्या कामाचे घाईघाईने भूमिपूजन करून पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अगोदर विकासकामे करा, नंतर पोस्टरबाजी करून श्रेय घ्या, प्रतिपादन माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी केले. 
गोदावरी पेट्रोल पंप ते टाकळी नाका या रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून भूमिपूजन होऊनही रखडले त्यामुळे या परिसरातील त्रासलेला व्यापा-यांनी आंदोलन पुकारले आहे. रस्ता अतिशय खराब असल्यामुळे ग्राहक दुकानाकडे फिरकत नाही. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे व धुळीच्या साम्राज्यात व्यापारी कसेबसे व्यवसाय करीत होते. आज होईल व उद्या होईल या आशेवर बसलेल्या व्यापा-यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे व्यापा-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या व्यापा-यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाठींबा दिला. याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे विजयराव आढाव, शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक संदीप वर्पे, विरेन बोरावके,राजेंद्र वाकचौरे, मंदार पहाडे,संदीप पगारे, हिरामण गंगुले,कृष्णा आढाव, दिनार कुदळे, फकीरमामू कुरेशी, दिनकर खरे, नवाज कुरेशी,राजेंद्र बोरावके, संदीप सावतडकर, राजेंद्र आभाळे, विशाल निकम,चांदभाई पठान, तुषार सरोदे, विकी जोशी, सुमित भोंगळे, दिनेश पवार, रुपेश वाकचौरे, जयेश हंसवाल, भूषण मुंदडा, डॉ. कडलग आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.