Breaking News

सेव्हन हिल्सने गुंतवणूकदारांची केली एक कोटींची फसवणूक

सोलापूर, - सेव्हनहिल्स रिअ‍ॅलिटीज या कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगून सुमारे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. सोलापूर शाखेचे व्यवस्थापक विशाल दत्तात्रय मोरे (वय 32, रा. निराळेवस्ती), प्रसाद बाबासाहेब ताड (वय 40, रा. श्रीरामनगर, जुळे सोलापूर), एन. प्रसाद नरसिम्हा रेड्डी ( वय 40, रा. हनुनेदल्ली, चिक्कबलापूर, कर्नाटक), नागराज रेड्डी नागजा रेड्डी (वय 59, रा. मीनाक्षीनगर, होसूर कर्नाटक) यांंना अटक झाली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर या पाचही जणांना तीन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.


नवी पेठेतील मोबाइल गल्लीत सेव्हन हिल्स रिअ‍ॅलिटीज प्रा. लि. सेव्हन हिल्स कंपनी काढून लोकांना पैसे गुंतवण्यास सांगितले. या कंपनीचे मुख्य कार्यालय डीव्हीजी रोड आदर्शनगर कोसूर, कर्नाटक येथे आहे. याची शाखा सोलापुरात मोबाइल गल्लीत 2012 ते 2015 या कालावधीत काढण्यात आली होती. ठेवीदारांना पिग्मी योजना, फिक्स डिपाझीट, विविध कल्याण योजना, दामदुप्पट योजना, सुवर्ण योजना तयार करून पैसे गुंतवणूक करून घेतले. कालांतराने कार्यालय बंद करण्यात आले. सुमारे एक कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक आहे. संतोष वसंतराव शिर्के (रा. सम्राट चौक) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संजय पवार यांनी तपास करून पाच जणांना अटक केली आहे. आणखी सात जणांना अटक नाही.

त्यांची नावे अशी - चेअरमन जी. नारायणअप्पा, सीईओ विजयकुमार, संचालक ई. एन. ढगे, वाय. आर. मधुसूदन, जी. रामचंद्रप्पा, टी. राजेह, एच. सिध्दूराजू (रा. सगळेजण - कर्नाटक). सरकारतर्फे आनंद कुर्डूकर, आरोपीतर्फे प्रशांत नवगिरे, गुरूदत्त बोरगावकर हे वकील काम पाहात आहेत.