माजी आमदारांनी सरकारी बोधचिन्ह वापरू नये.
लखनौ : उत्तर प्रदेशच्या माजी आमदारांना राज्य सरकारच्या बोधचिन्हाचा वापर न करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी सोमवारी दिले. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कोणत्याही माजी सदस्याने सरकारच्या बोधचिन्हाचा वापर करू नये. फक्त विद्यमान आमदारांनीचा या लोगोचा वापर करावा, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
ज्याप्रमाणे एखाद्या संस्थेतील व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतर त्याला संस्थेचा लोगो वापरता येत नाही. तोच नियम आमदारासाठी लागू आहे, असे ते म्हणाले. एका माजी आमदाराने असे बोधचिन्ह असलेल्या आपल्या लेटरहेडवरून राज्यपालांना पत्र पाठवले. राज्यपालांनी ही बाब विधानसभा अध्यक्षांच्या नजरेस आणून दिली. सद्यस्थितीत यूपीत २ हजार माजी आमदार आहेत. बोधचिन्हाच्या वापरासंबंधी पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांकडून अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.