Breaking News

सदाशिव टेटविलकरांची पुस्तके आता इंग्रजीत

ठाणे, दि. 27, जानेवारी - सुप्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची ‘महाराष्ट्रातील वीरगळ’, ‘दुर्गलेणी-दीव, दमण आणि गोवा’ ही दोन पुस्तके आता इंग्रजीत ई-बुक स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. कोकण इतिहास परिषदेच्या वतीने ठाण्यात 27 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता गडकरी कट्ट्यावर या ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन होईल. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठी पुस्तकही आता ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार आहे.


प्राचीन काळापासून युद्धभूमीवर मरण पावलेल्या शूरवीरांचे स्मारक उभारण्याची प्रथा प्रचलीत होती. आताही या स्मारकशिळा ठिकठिकाणी आढळून येतात. सदाशिव टेटविलकर यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून वैशिष्ट्यपूर्ण वीरगळांचा अभ्यास केला. त्यांच्या पुस्तकामुळे प्रथमच इतिहासातील हा दुर्लक्षित धागा प्रकाशात आला. आता ‘हीरोस्टोन ऑफ महाराष्ट ्र’ या नावाने हे पुस्तक इंग्रजीत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे गोवा, दिव आणि दमण या प्रांतातील गड, किल्ल्यांची माहिती देणारे त्यांचे मूळ मराठी पुस्तकही ‘फोर्ट केव्हजस्’ म्हणून इंग्रजीत उपलब्ध होईल. या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद पुण्यातील माधुरी गोखले यांनी केला आहे. ब्रोनॅटो डॉट कॉमच्या शैलेश खडतरे यांनी ई-बुक आवृत्ती वाचक ांना उपलब्ध करून दिली आहे. इतिहासप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण इतिहास परिषदेने केले आहे.