Breaking News

माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र,विश्‍व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांचा गंभीर आरोप


अहमदाबाद/वृत्तसंस्था : विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मगंळवारी पत्रकारपरिषेद घेत माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला. तोगडिया हे सोमवारी पहाटेपासून अचानक बेपत्ता झाले होते. तब्बल 12 तासांनी ते एका बागेमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर अहमदाबादेतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या एन्काऊंटरचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेतच त्यांना रडू कोसळले.
एक माणूस अचानक माझ्या घरात घुसला. त्याने मला सांगितले की तुमचा एन्काउंटर होणार आहे. आयबीच्या माध्यमातून मला घाबरवले जात आहे. इतके असूनही मी काल पोलिसांना सोडून रिक्षातून निघालो होतो. लोकेशन कळू नये म्हणून मी फोन स्वीच ऑफ केला होता. जयपूरला विमान पकडण्यासाठी निघालो होतो, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाटेतच बेशुद्ध पडलो, पुढचे काही आठवत नाही, असे तोगडियांनी सांगितले. जुने खटले काढून मला त्रास देण्याच प्रयत्न सुरु आहे. या खटल्यांच्या नावे माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप तोगडिया यांनी केला. तोगडिया म्हणाले, काही दिवसांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र हिंदू एकतेसाठी माझं काम सुरुच राहील. अहमदाबादमध्ये रात्रीच्या सुमारास ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील शाहीबाग परिसरातील चंद्रमणी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. चंद्रमणी रुग्णालयाचे डॉ. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, अहमदाबादच्या कोटरपूर भागातील पार्कमध्ये एका व्यक्तीला प्रवीण तोगडिया बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्याने कॉल करुन अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. तोगडिया यांना रात्री 9 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील साखरेचे प्रमाण घटल्याने ते बेशुद्ध झाले होते. तोगडिया यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानतंर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.