Breaking News

धनवटे हत्या प्रकरणातील उर्वरित सहा आरोपीना अटक करण्याची मागणी


नेवासा /शहर प्रतिनिधी/- परिसरातील संभाजीनगर येथील राहुल परसराम धनवटे हत्या प्रकरणातील उर्वरित सहा आरोपीना अटक करा अन्यथा दि. ३० जानेवारी रोजी नेवासा शहर व फाटा बंद ठेऊन रास्ता रोको करण्याचा धनवटे कुटुंबियांसह संभाजी नगर येथील ग्रामस्थ,वडार समाज व शिवसेनेने दिला आहे.

दि. १ जुलै २०१७ रोजी राहुल धनवटे याची नेवासा फाटा येथे दोन गटातील हाणामारीत तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करण्यात आल्याने राहुल उपचारानंतर मयत झाला होता. या प्रकरणात एकूण दहा आरोपी होते, त्यातील चार आरोपीना अटक झालेली आहे. उर्वरित आरोपी अद्याप अटक नाही. आरोपीना लवकर अटक न झाल्यास दि. ३० जानेवारी रोजी नेवासा शहर व नेवासा फाटा बंद ठेऊन रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदरचे निवेदन नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे याना देण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. यावेळी बोलतांना शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार म्हणाले की, राहुल धनवटे हत्या प्रकरणातील आरोपीना कठोर कारवाई करावी. आठ दिवसात आरोपी पकडल्या जाईल असे सांगितले होते. मात्र सात महिने उलटले तरी अजून आरोपी मोकाट आहे .

शिवसेना महिला आघाडीच्या पुजा लष्करे म्हणाल्या की, धनवटे हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत आहे. आरोपींची दहशत आहे त्यामुळे आरोपीना अटक न झाल्यास सर्व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यावेळी अनिल धनवटे, मयूर वाघ, अनिल कुसळकर, सुनील कुसळकर, ज्ञानेश्वर दहातोंडे, नीरज नांगरे, गणेश गायकवाड, ज्ञानू दवेकर, अजय पवार, बाल्या जाधव, सुनील शिंदे, देवा लष्करे, विकास लष्करे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.