जागरण-गोंधळातून काढले सरकारचे वाभाडे
तुळजापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोरील महाद्वारासमोर जागरण गोंधळ घालून राष्ट्रवादीच्या दुसर्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे सांगत हे सरकार दूर व्हावे, असे साकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेला घातले आहे.
तुळजाभवानीचे पारंपरिक गोंधळी राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली 11 गोंधळी पारंपरिक वेशभूषेत जागरण-गोंधळ घालण्यात आला. खास गोंधळी गीतातून सत्ताधारी भाजप-सेनेच्या सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आदी नेते उपस्थित आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते तुळजापुरात दाखल झाले आहेत. सकाळी जागरण गोंधळ घालून या आंदोलनास प्रारंभ झाला. नंतर शहरातून मोर्चा काढून तहसीलारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात दिलीप वळसे पाटील यांच्यासह महिला प्रदेशअध्यक्षा चित्राताई वाघ, पद्मसिंह पाटील, राणा जगजीत सिंग, अमरसिंह पंडित, विक्रम काळे, सतीश चव्हाण, दीपक आबा साळुंके, विद्या चव्हाण, बसवराज पाटील नागराळकर, संदीप बाजोरिया, संगीता ठाकरे, नरेंद्र बोरगावकर, सोनाली देशमुख,रामराव वडकुते, संग्राम कोते आदींची उपस्थित होते.
