Breaking News

दखल - तोगडियांचे आरोप मोदींची अडचण वाढविणार


विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया व पंतप्रधान नरेंद मोदी हे एकेकाळचे जवळचे मित्र. तोगडिया कट्टर हिंदुत्त्ववादी. तसंच मोदीही. तोगडिया वादग्रस्त बोलण्याबाबत प्रसिद्ध. दोन धर्मांत तेढ निर्माण करणारी वक्तव्यं त्यांनी यापूर्वी बर्‍याचदा केलेली. त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल झालेले. राम मंदिर व्हावं, हा त्यांचा ध्यास. भाजपचं सरकार येऊनही राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, समान नागरी कायदा होत नाही, त्यामुळं मध्यंतरी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता तर त्यांच्याविरोधातल्या वॉरंटमुळं त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टार्गेट केलं आहे. तोगडिया सोमवारी पहाटेपासूनअचानक बेपत्ता झाले होते.
तब्बल 12 तासांनी ते एका बागेमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर अहमदाबादेतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या एन्काऊंटरचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेतच त्यांना रडू कोसळलं. इशरत जहॉ, सोहराबुद्दीन बनावट चकमकीमुळं गुजरातची अगोदरच ख्याती असल्यामुळं आता तोगडिया यांच्या आरोपामुळं पूर्वीच्या घटनांना उजाळा मिळाला आहे. गुजरातमध्ये मोदी यांच्या आशीवार्दानं काहीही घडू शकतं, असा तोगडिया यांच्या आरोपाचा रोख असून त्यामुळं एकाच परिवारातील ही टोकाची भांडणं भाजपची आणि विशेषत: मोदी यांची डोकेदु:खी वाढवायला कारणीभूत ठरू शकतात. हार्दीक पटेल आणि गुजरात काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया यांनी तोगडिया यांची भेट घेतल्यानं आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे. 

मी हिंदू ऐक्यासाठी लढत आहे. देशभरात माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने खटले काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला अटक करून एका तुरुंगातून दुसर्‍या तुरुंगात पाठवण्याचं काम गुजरातमधून सुरू झालं. मकरसंक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचं पथक अजामीनपात्र वॉरंट घेऊन मला अटक करण्यासाठी आलं होतं. मी पूजा करत असताना एक व्यक्ती माझ्या घरात आली. त्यानं माझ्या एन्काऊंटरसाठी लोक निघाले आहेत, असं सांगितलं. मी मृत्यूला घाबरत नाही; परंतु त्यानंतर मला एक फोन आला. राजस्थान पोलिसांचा ताफा गुजरात पोलिसांच्या मदतीनं मला अटक करण्यासाठी येत असल्याचं मला समजलं, अशा आरोपांच्या फैेरी तोगडिया यांनी झाडल्या. गुजरात व राजस्थान या दोन्ही राज्यांत भाजप सत्तेत आहे. राजस्थानच्या गंगापूर न्यायालयानं 10 वर्षे जुन्या दंगलीच्या एका प्रकरणात तोगड़िया यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावलं होतं. अनेक वेळा जामीनपात्र वॉरंट असूनही ते कोर्टात हजर झाले नाही, तेव्हा न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. हे वॉरंट बजावण्यासाठीच राजस्थान पोलिस सोमवारी अहमदाबाद गेले होते; परंतु तोगडिया न आढळल्याने त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं होतं.

माझं काही होण्याची मला भीती नाही; परंतु त्यामुळं देशभरातील वातावर चिघळेल, असं सांगून तोगडिया यांनी आपण बाहेर पडल्याचं सांगितलं. रस्त्यात मी राजस्थानच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना संपर्क केला. त्यांनी कोणतंही पथक निघालं नसल्याचे सांगितलं. एका घरात जाऊन मी वकिलांना आणि तज्ज्ज्ञांशी साधला. त्यांनी जयपूरमध्ये न्यायालयासमोर शरणागती पत्कारण्याचा सल्ला मला दिला. जयपूरला जाण्यासाठी मी रिक्षानं विमानतळाकडं निघालो; पण मला श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाला त्यानंतर मी बेशुद्ध झालो, नंतर काय झालं मला काहीही कळलं नाही, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण सांगितलं. मी गुन्हेगार नाही; पण माझ्या घराच्या, कार्यालयाच्या तपासणीचे प्रयत्न का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. तोगडिगायांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही वेळानं गुजरातचे माजी डीजीपी डी.जी.वंजारा यांनी त्यांची भेट घेतली. त्यासोबतच पाटीदार नेता हार्दीक पटेलही तोगडियांच्या भेटीसाठी गेला. 

पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह हे दोघे प्रवीण तोगडियांविरोधात षडयंत्र रचत आहेत, असा आरोप हार्दीकनं केला. गेल्या काही महिन्यांपासून तोगडिया यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींशी 15 वर्षांपासून असलेल्या त्यांच्या तणावपूर्ण संबंधांवर चर्चा सुरू झाली आहे. एक काळ असाही होता, जेव्हा मोदी आणि तोगडिया घनिष्ठ मित्र होते. दोघंही एकाच स्कूटरवर बसून संघाचा कार्यकर्त्यांना भेेटायला जात होते. तथापि, 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनताच दोघांच्या संबंधात कटुता आली. विहिंपच्या काही नेत्यांच्या मते, तोगड़िया यांच्याविरुद्ध मागच्या महिन्यात घटनाक्रम वेगाने बदलत गेला. संघ परिवार आणि भाजपला वाटतं, की विश्‍व हिंदू परिषदेने तोगडियांना मुक्त करावं. 

त्यामुळं त्यांना संघाच्या बॅनरखाली नवनवे कार्यक्रम राबवता येतील. तोगड़ियांनी मात्र त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध जुन्या केसेसमध्ये कारवाईनं वेग घेतला. नुकतीच भुुवनेश्‍वरमध्ये विहिंपच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली होती. तोगड़िया यांचा आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2017 रोजी संपला होता आणि त्यासोबतच अध्यक्ष राघव रेड्डी यांचाही कार्यकाळ संपत होता. संघाला रेड्डी यांच्या जागी व्ही. कोकजे यांना अध्यक्ष करायचं होतं; परंतु तोगड़ियांनी जोरदार विरोध केला आणि रेड्डींना पदावर ठेवण्यासाठी आग्रह धरला. नंतर तोगड़ियांनी एका विशाल सभेला संबोधित केलं. त्या सभेत काही नेत्यांना मला हटवायचं आहे, असा आरोप करून तोगड़ियांनी राम मंदिर आणि गोरक्षेबद्दल केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. एवढंच नाही, तर त्यांनी गोसेवेसाठी काँग्रेसचं कौतुकही केलं. गेल्या 15 दिवसांत तोगड़ियांचं नाव दोन प्रकरणांत समोर आलं आहे. यात एक गुजरात आणि दुसरं राजस्थानचं आहे. गुजरातच्या 22 वर्षे जुन्या प्रकरणात तोगड़िया आपल्या समर्थकांसह कोर्टात गेले होते. 

तथापि, त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या राजस्थान पोलिसांना रिकाम्या हातानं परतावं लागलं. ज्या प्रकारे या घटना तोगड़िया यांच्या विरुद्ध घडत आहेत, त्यावरून भाजप तोगड़िया यांना सोडणार नाही. 2002 मध्ये मोदी यांनी मुख्यमंत्री असताना तोगड़िया यांना सरकारच्या कामकाजात विशेषकरून गृह विभागाच्या प्रकरणांत हस्तक्षेप करू देण्यास विरोध केला होता. तिथून दोघांच्या संबंधात कटुतेला सुरुवात झाली होती. मोदी सरकारनं गांधीनगरमध्ये दोनशे मंदिरं पाडली आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर लालकृष्ण अडवाणी यांनी स्तुतिसुमनं उधळल्यानंतर आंदोलन करणार्‍या विहिंप कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली, त्यानंतर दोघांतील वाद आणखीच वाढला. तोगडिया यांनी मोदींच्या 2011 मध्ये मुसलमानांसाठीच्या सावना संदेशाची खिल्ली उडवली आणि म्हटलं होतं, की त्यांनी प्रतिमा बदलासाठी हिंदुत्वाचा अजेंडा त्यागला आहे. वादाची ठिणगी त्यातून पेटत गेली.