Breaking News

अग्रलेख - महागाईचा भडका उडण्याची चिन्हे!

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरांवरून, बेरोजगारी, महागाई यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठत असतांना, काही वित्तिय संस्थेचे अहवाल समोर येऊन, त्यांची पाठराखण करण्यात येते. ज्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याची वार्ता जनसामान्यांत पोहचवण्यात येते. काही दिवंसापूर्वीच विकासाच्या दर खालावत चालला असून टीकेची झोड उठली असतांनाच, जागतिक बँकेचा अहवाल मोदीसरकार साठी दिलासा देणारा ठरला असे असले, तरी पुढील काही दिवसांत महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. हा महागाईचा भडका, मोदी सरकारसह विविध राज्यातील सरकार कसे रोखणार हा प्रश्‍न आहे. अन्नधान्य व इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. दुसरीकडे जीएसटी, नोटांदीतून देशाची अर्थव्यवस्था अजूनही सावरण्याची चिन्हे नाहीत. जीएसटीमुळे सर्व महसूल हा केंद्राच्या अखत्यारीत जमा होणार आहे. त्यातून मग राज्यांची परिस्थिती ही बिकट होत चालली आहे. यातून मार्ग काढण्याचे, त्यातच राजकारणांतील पेचमधून मार्ग काढण्यासह अनेक प्रश्‍न सध्या मोदी सरकारसमोर आहे. अशावेळी यातून मार्ग कसा काढणार हा महत्वाचा प्रश्‍न आहे. मोदी सरकार पुढील निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी खूप कमी अवधी उरला आहे. अशावेळी निर्णय घेतांना, त्यांना पुढील खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यातच महागाई, बेरोजगारीचा निर्देशांक खाली आला नाही, तर विरोधकांसाठी हातात आयतेच कोलीत मिळणार आहे. 

रिझर्व्ह बँकेने चार ते साडेचार टक्के दराने महागाई वाढण्याचे संकेत व्यक्त केल्यानंतर त्यापेक्षा वेगाने महागाई वाढत चालली आहे. किंमती कमी करण्याचे आश्‍वासन देवून मोदी सत्तेत स्थानापन्न झाले आणि महागाई कमी करण्यात त्यांना आलेले अपयश लपविण्यासाठी बाजारपेठीतील तथाकथित संशोधन संस्था यांच्या माध्यमातून घाऊक महागाई निर्देशांक कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात घाऊक बाजारपेठेत फारशी महागाई कधीच नसते. कारण शेतीमालाची घाऊक बाजारपेठ ही शेतकर्‍यांकडून माल खरेदी करण्याची असते. शेतकर्‍याला मालाचा योग्य भाव मिळू नये यासाठी व्यापारी अडते प्रयत्नशिल असतात. त्यांना घाऊक बाजारपेठेत कीतीही स्वस्त मिळाली तरी कीरकोळ विक्री करतांना ते किमान पाच ते दहा पट किंमतीलाच त्या वस्तूची विक्री करतात. त्यामुळे घाऊक बाजारपेठेत किंमत नियंत्रित रहात असली तरी कीरकोळ बाजारपेठेत किंमती भडकलेल्याच असतात. 

याचच अर्थ सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने महागाई आहे तशीच असते आणि आहे. तरीही बाजारपेठेत महगाई कमी झाल्याचा निर्वाळा काही तथाकथित संस्था देवू लागल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला मुर्ख बनविणार्‍या या कोल्हेकुईंना ताबडतोब थांबविण्यात आले पाहिजे. जोपर्यंत सामान्य जनतेला दोन-तीन वर्षांपूर्वी वस्तू होत्या त्या किंमतीला मिळत नाहीत, तो पर्यंत महागाई कमी झाली असे म्हणता येत नाही. पूर्वीचे कांद्याचे, डाळीचे दर बघितले, म्हणजे महागाई किमान चारपटीने आजही कायम आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे सांगून नवे सरकार कसे आपल्या धोरणात यशस्वी झाले आहे, याची अप्रत्यक्ष भलावण यातून केली जात आहे. यावरुन आपणांस असे दिसून येईल की मोदी सरकार जी आश्‍वासने देवून सत्तेत आले आहेत, त्यांची पूर्तता न करता लोकांना मुर्ख बनविण्यात गुंतले आहे. परंतु त्यांना कुणीतरी कल्पना द्यायला हवी, की जगात सगळ्या लोकांना सर्वकाळ मुर्ख बनविता येत नाही. त्यामुळे सुर्य आणि जयद्रथ कधीतरी समोरासमोर येणारच!