Breaking News

सिंधुदुर्ग किल्ला साफसफाईला सुरुवात

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - सिंधुदुर्ग किल्ल्यात वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीकडून साफसफाईच्या कामास सुरुवात झाली आहे. पर्यटकांना किल्ला दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी किल्ल्यात वाढलेली झाडी-झुडपे तोडून परिसराच्या सफाई कामास वेग आलाय. पर्यटकांकडून आकारण्यात येत असणार्‍या कराच्या रक्कमेतून हे काम करण्यात येत आहे. 


मालवणच्या कुरटे बेटावर शिवाजीमहाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. स्थापत्य शास्त्रातल एक आश्‍चर्य असलेला हा किल्ला साडेतीनशेहून अधिक काळ लोटला तरी ऊन, वारा, पाऊस व समुद्राच्या लाटांचा सामना करीत ताठ मानेने उभा आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ख्याती संपुर्ण जगात पसरली आहे. आपल्या देशाबरोबरच परदेशी इतिहास अभ्यासक आणि इतिहास प्रेमी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देतात. 47 एकर जागेत वसलेल्या या किल्ल्याच्या परिसरात मोठया प्रमाणावर झाडी-झुडपे वाढल्यामुळे ठराविक वाटा वगळता किल्ल्याच्या बर्‍याच मोठ्या अंतर्भागात फिरणे अशक्य बनले आहे. याच झाडीझुडपात ऐतिहासिक पाऊलखुणा सुद्धा लपल्या गेल्या आहेत. 


इतिहास अभ्यासक आणि इतिहासप्रेमी यांना संपूर्ण किल्ल्याचे दर्शन व्हावे यासाठी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारा हा किल्ला ग्राम पंचायतीच्या वतीने साफ क रण्यात येतोय . संपूर्ण किल्ल्यातील झाडीझुडपे साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. किल्ल्यातील संपूर्ण साफसफाई पूर्ण होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी येणार्‍या पर्यटकांकडून आकारण्यात येत असणार्‍या कराच्या रक्कमेतून हा खर्च करण्यात येत आहे. याचे उदघाटन सरपंच भाई ढोके यांच्या हस्ते क रण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, ग्रामसेवक चव्हाण, उपसरपंच संदेश तळगावकर, माजी उपसरपंच ललित वराडकर, सदस्य विरेश नाईक, ग्रामस्थ आनंद बांबार्डेकर, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत, विश्‍वंभर फाटक, सादिक शेख, वायंगणकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संपूर्ण किल्ल्यातील मोठी झाडे वगळून झाडीझुडपांची साफसफाई केल्यानंतर ठराविक ठिकाणी शोभेची व इतर झाडे लावण्यात येणार आहेत. संपूर्ण किल्ल्याची साफसफाई पूर्ण होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी या क ार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.सिंधुदुर्ग किल्ल्यातील साफसफाई कामास सुरुवात केल्यामुळे किल्ला दर्शनाची व्याप्ती वाढणार असल्याने पर्यटक आणि इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.