Breaking News

पानटपर्‍यांवर गोळी-चॉकलेट विक्रीला बंदी

मुंबई, दि. 25, जानेवारी - लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये, यासाठी राज्य सरकारने पान टप-यांवर चॉकलेट, वेफर्स, बिस्किटे यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्यभरात पानटप-यांवर चॉकलेट,बिस्किटे यापुढे विकली जाणार नाहीत. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानांमध्ये चॉकलेट, बिस्किट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ आढळले, तर दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केले.


तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक नसल्यामुळे याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे सोपवले होते.
पानाच्या टपर्‍यांवर सर्रासपणे गोळ्या, चिप्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तरुणवर्ग दुकानात येतो. त्याचवेळी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाकडे ते आकर्षित होण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.