Breaking News

पाच वर्षासाठी होणार कामगार नोंदणी


सिंधुदुर्गनगरी,  - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाखाली नोंदणी ही यापुढे पाच वर्षांसाठी होणार असून पाच वर्षांनंतर नूतनीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला एक रुपयाप्रमाणे पाच वर्षांचे 60 रुपये भरून नोंदणी करण्याचा निर्णय 3 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघ जिल्हा सरचिटणीस हरी चव्हाण यांनी दिली.

बांधकाम मंडळाची बैठक कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. यावेळी कामगार आयुक्त पोयाम, मंडळ सचिव सारंगम, भारतीय मजदूर संघाचे मंडळ सदस्य श्रीपाद कुटास्कर, वेदा आगटे व अन्य अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी बांधकाम कामगारांकडून एका वर्षासाठी नोंदणी वर्गणी 60 रुपये भरून दरवर्षी ओळखपत्राचे नुतनीकरण करावे लागत होते. परंतु भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार आता फक्त 60 रुपये भरून पुढील पाच वर्षांसाठी तो बांधकाम कामगार म्हणून मंडळाजवळ नोंदीत राहणार असून पाच वर्षांनंतर पुन्हा नुतनीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांची अनेक कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेतून सुटका झाली आहे.

भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नोंदीत बांधकाम कामगाराने भाग घेऊन प्रशिक्षण घेतल्यास अशा कामगारांना बक्षीस म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंडळाजवळ नोंदीत असलेल्या कुटुंबातील एका कामगाराला बांधकाम साहित्य खरेदीसाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य वाटप करण्यात येत आहे. परंतु मंडळाच्या झालेल्या बैठकीत कुटुंबातील एक कामगार ही अट रद्द करून सर्व नोंदीत कामगारांना बांधकाम साहित्य खरेदीसाठी 5 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. नोंदीत बांधकाम कामगार पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत सहभागी झाला असल्यास या बांधकाम कामगाराला बांधकाम मंडळाकडूनही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एखाद्या नोंदीत बांधकाम कामगाराने बँकेच्या कर्ज योजनेंतर्गत घर घेतले असल्यास या कामगाराची बँकेच्या कर्जावरील व्याज रक्कम मंडळाकडून भरणा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.