Breaking News

व्यंकटेश पतसंस्थेसमोर ठेवीदारांचे आमरण उपोषण


सोनई प्रतिनिधी :- येथील व्यंकटेश ग्रामीण पतसंस्थेत अडकलेल्या ५ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी ठेवीदारांनी आजपासून {दि.२३} पतसंस्थेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. या पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी मिळविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या मिळत नाहीत. त्यामुळे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे या ठेवीदारांनी सांगितले. 
यासंदर्भात अजित {प्रविण} बडे यांनी सांगितले, की सुमारे दीड वर्षांपासून आम्ही सारे ठेवीदार या पतसंस्थेकडे आमच्या ठेवी परत मागत आहोत. मात्र पतसंस्था व्यवस्थापनाने आजतागायत कोणाला एक रुपयादेखील दिलेला नाही. या पतसंस्थेत माझे वैयक्तिक १९ लाख रुपये अडकले आहेत. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक आणि पतसंस्था कार्यालयाकडे पाठपुरावा केला. मात्र कुठलेही ठोस आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. ठेवीची रक्कम मागितली असता पतसंस्था प्रशासनाकडून असे सांगण्यात आले, की दि. ८ नोव्हेंबरच्या नोटबंदीमुळे आर्थिक अडचण आली, तरलता संपली. मात्र या पतसंस्थेचे ऑडिट झालेले नाही. या पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि येथील सर्वच अधिकारी-कर्मचार्यांनी तब्बल ५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे बडे यांनी सांगितले. या उपोषणात सर्वश्री कुंतीलाल भळगट, बाळासाहेब भळगट, फुलचंद चोरमले, अशोक हलाल, शंकरराव तेलोरे, संजय खंडागळे, बाळासाहेब घाडगे, मकरंद जोगदे आदींसह अनेक ठेवीदारांनी भाग घेतला.