Breaking News

सत्यमेव जयते स्पर्धेसाठी पारोळा अमळनेर तालुक्यांची निवड

जळगाव, - सिनेअभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अमळनेर आणि पारोळा तालुक्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ यांनी दिली. 


पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसंदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हा नियोजन सभागृहात कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, अतिरीक्त मुकाअ संजय मसकर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ हे उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देतांना डॉ. पोळ यांनी सांगितले की, पाणी फाउंडेशनतर्फे आयोजीत सत्यमेव जयते वॉटर क प स्पर्धेसाठी यंदा राज्यातील 75 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यांनी स्पर्धेसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे.
तसेच अमळनेर आणि पारोळा या तालुक्यातील प्रत्येकी पाच व्यक्तींची (दोन महिलांचा समावेश) प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पाणलोट, जलसंधारण विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात 45 प्रशिक्षण केंद्रे असून त्याचा सर्व खर्च पाणी फाउंडेशन करणार आहे. सुमारे 45 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धे साठी आमीर खान यांच्या स्वाक्षरीचे अर्जही पाठविण्यात आले आहेत. दि. 8 एप्रिल ते 22 मे असा स्पर्धेचा कालावधी राहील. यात जल आणि मृद संधारणात जे गाव चांगले काम करेल त्यांना राज्यस्तरीय पारीतोषिक दिले जाणार आहे. पहीले पारीतोषिक 75 लाख रूपये असून द्वितीय 50 लाख, तृतीय 40 लाख, आणि तालुक्यातून प्रथम येणार्‍या गावास 10 लाख रूपयांचे पारीतोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय परीक्षण समितीचे प्रमुख म्हणून पोपटराव पवार हे काम पाहत असल्याचे डॉ.अविनाश पोळ यांनी सांगितले. बैठकीला विभागीय समनव्यक गणेश मांडेकर, तालुका समन्वयक नीलेश राणे, दीपक सैंदाणे, विजय कोळी, उज्ज्वला प्रसाद आदी उपस्थित होते.