Breaking News

अवैध प्रवासी वाहतुकीततून हजारोंची ‘माया’ नागरिकांत संताप


संगमनेर शहर प्रतिनिधी :- शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक मोठया प्रमाणावर होत आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांच्या डोळ्यासमोर हा प्रकार सुरु आहे. परंतु याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना डावलून संबंधित पोलीस कर्मचारी दरमहिन्याला हजारो रुपयांची ‘माया’ गोळा करत असल्याचे बोलले जात आहे. 
शहरातील दिल्ली नाका, नवीन नगर रोड, अकोले नाका, बसस्थानक आदी महत्त्वाच्या परिसरात शेकडो वाहने अवैध प्रवाशी वाहतूक करत आहेत. वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता हे वाहन चालक प्रवाशांची वाहतूक करत असतात. संगमनेर-श्रीरामपूर, अकोले या गावांमध्ये दररोज वाहतुकीच्या अनेक खेपा मारल्या जातात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णतः दुर्लक्ष करुन ही अवैध प्रवाशी वाहतूक सुरु आहे. 

नवीन नगर रस्ता हा शहरातील अतिशय महत्त्वाचा आणि नेहमी र्वदळ असणारा रस्ता आहे. या परिसरात अनेक रुग्णालये, शासकीय कार्यालये आहेत. काळ्या-पिवळ्या जीप रस्त्यावर कुठेही थांबत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळे अनेकदा वाद होण्याचे प्रकार घडले आहे. पोलीस उपाधिक्षकांचे कार्यालयदेखीळ याच रस्त्यावर आहे. मात्र त्यांच्याही निदर्शनास ही अवैध प्रवासी वाहतूक येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संगमनेरातील वाहतुकीला शिस्त लागवी, यासाठी पोलिसांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. पोलिस निरीक्षकांनी यावर लक्ष ठेवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र हे अधिकारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांकडून ‘माया’ गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे बोलले जाते.

अवैध प्रवाशी वाहतूक करणारांकडून दरमहा ठराविक रक्कमेचा हप्ता घेतला जात असल्याचे खुद्द वाहनचालकच सांगतात. प्रत्येक वाहनाचा दरही संबंधित अधिकार्याने वाहन चालकाला ठरवून दिला आहे. यातून लाखो रुपये उकळले जात आहे. पोलिसांचीच साथ असल्याने वाहन चालक ‘मस्त’ असल्याचे दिसत आहे. शहरातील संभाव्य धोके टाळण्यासाठी पोलिस अधिकार्यानी ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधू होत आहे.