Breaking News

अग्रलेख - विकासात्मक राजकारणांचा अभाव !

राजकारणांचा परीघ सातत्याने बदलत चालला असून, राजकारणांच्या प्रत्येक वक्तव्यातून विकासाचा अभाव दिसून येत असून, हे वक्तव्य फक्त राजकारण आणि स्वत:ची प्रतिमा सांभाळणारे राजकारण दिसून येते. त्यामुळेच मूळ विषयाला बगल देत, त्या प्रश्‍नांवर राजकीय रोख नेऊन ते, प्रश्‍न पचवून टाकण्याचे राजकारण्यांचे कसब आताच्या काळात दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण चर्चा, उत्तरे या राजकारणांचा बाज आता मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. भीमा-कोरेगाव येथील दंगलीनंतरही या गुन्ह्यातील आरोपी आजही मोकाट आहेत. यासर्व पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केलेले निवेदन गंभीर असून, सरकारचे अपयश दडविण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येते. 

भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी काळात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे. सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे घडत असून, विकासकामांच्या गतीने अस्वस्थ झालेली मंडळी यामागे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सत्ता भाजपची असून, ते कोणत्याही षडयंत्राला हाणून पाडू शकतात. भीमा-कोरेगाव हे जर सरकारची प्रतिमा हनन करण्यासाठी षडयंत्र रचले होते, असा दावा जर मुख्यमंत्री बोलत असेल, तर त्यांनी या षडयंत्राचे खरे सुत्रधार कोण? त्यांचे नावे जाहीर करून, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र आपली प्रतिमा जपत, आरोपींना पाठीशी घालण्याचाच हा गंभीर प्रकार आहे. वास्तविक मूळ विषयाला बगल देत, जर हा षडयंत्राचा भाग आहे, असे तुम्ही सांगत असाल, तर आरोपींवर कारवाई करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

तसेच सरकारकडून विरोधकांच्या हल्लाबोल यात्रेला उत्तर देण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्याची भाषा करावी लागते, यासारखी दुसरी शोकांतिका नाही. राज्यातील जनतेला नेमके काय हवे आहे? याचा अभ्यास जर सत्ताधार्‍यांचा नसेल तर? अशी तिरंगा यात्रा काढावी लागेल. राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली असेल, गुन्हेगारीला आळा बसलेला असेल, भ्रष्टाचार कमी झाला असेल, हाताला रोजगार असला, शेतकरी सुखी असला म्हणजे जनतेचा रोष वाढत नाही. मात्र आज राज्यात एक प्रश्‍न समोर नाही. हजारो प्रश्‍न समोर आहे. त्या प्रश्‍नांचा निपटारा जर गोगलगाईसारखा होत असेल, आणि त्याचे खापर विरोधकांवर फोडण्यात सरकार धन्यता मानत असेल तर जनतेने काय करावे. कोणताही प्रश्‍न समोर आला की, प्रथम विरोधकांच्या हेतूवर शंका घेतली जाते. त्यामुळे आजचे वातावरण अराजकतेकडे नेणारे आहे. 

निकोप खिलाडूवृत्तीचा लोप झाला असून, त्याची जागा षडयंत्राने घेतली आहे. वास्तविक संसदेत अनेकवेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोख देखील काहीसा असाच राहिला आहे. गंभीर टीकांना उत्तर देण्याऐवजी त्याची खिल्ली उडवून, त्या प्रश्‍नांना बगल देण्याचा प्रयत्न अनेकवेळेस पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यामुळेच अलीकडच्या राजकारणांचा पोत हा सातत्याने बदलत असून, राजकारण आत्मकेंद्री झाल्याचे दिसून येते. सत्ताधारी आणि विरोधक लोकशाहीचे दोन अविभाज्य घटक असून, दोन्ही घटकांना महत्व आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर सत्ताधार्‍यांनी देखील जवाबदारीने लोकशाहीत वागायला पाहिजे. शेवटी आपण जनतेला उत्तरदायित्व असू, याची काळजी घेत, विकासात्मक राजकारणांवर चर्चा झडायला पाहिजे. मात्र त्याचा अभाव दिसून येत आहे.