Breaking News

आ. वाघमारे यांच्या रौद्र भुमिकेमुळे साबां भ्रष्टाचाराच्या चौकशीला गती आमदार -प्रधान सचिवांची मॅरेथान चर्चा


मुंबई/विशेष प्रतिनिधी : मनोरा आमदार निवास इमारत अपहार प्रकरणाच्या पक्षपाती आणि प्रलंबित चौकशी संदर्भात भाजपा आ. चरणभाऊ वाघमारे यांनी कठोर भुमिका घेत रौद्र रूप धारण केल्याने सार्वजनिक बांधकाम प्रशासन तातडीने कामाला लागले असून प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या सन 2015-16 व 2016-17 या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळात आमदार निवास विशेषतः मनोरा इमारतीच्या आमदार कक्षांमध्ये दुरूस्तीच्या कामात झालेला गोंधळ आणि त्या गोंधळातून संबंधितांनी कोट्यावधीच्या निधीचा अपहार केल्याची सिध्दता सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार हे गेल्या चार महिन्यांपासून करीत आहेत. तत्पूर्वी या प्रकरणाची प्राथमिक स्तरावर मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी केली आहे. या चौकशीत सत्यता आढळून आल्यानंतर या अपहार प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि त्यांचे सहकारी उप अभियंता, शाखा अभियंता यांनी आमदार कक्षांत केलेल्या दुरूस्तीच्या नावाखाली 5 कोटी रुपयांचा अपहार केला. असे सिध्द होत असल्याचा अहवाल सुर्यवंशी यांनी प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना सादर केला. या अहवालाच्या आधारावर उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तथापी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर अपहाराची जबाबदारी निश्‍चित होत असतानाही त्यांच्यावर बदली खेरीज अन्य पात्र कारवाई करण्यास टाळटाळ झाली. असा आक्षेप आ. चरणभाऊ वाघमारे यांनी घेतल्या नंतर मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. दक्षता पथकानेही या अपहार प्रकरणाच्या चौकशीत वेळ काढू धोरण स्वीकारल्याचा आ. वाघमारे यांचा आक्षेप आहे. दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता चामलवार यांच्यावर या चौकशी प्रकरणी दबाव असल्याचे निरीक्षण आ. वाघमारे यांनी नोंदविले आहे.
या पार्श्‍वभूमीवर आ. चरणभाऊ वाघमारे यांनी आज बुधवार दि.24 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांची भेट घेऊन आजपर्यंत सर्व घटनाक्रम त्यांच्या समोर सादर केला. ज्या चौकशी अहवालाच्या आधारे शहर इलाखा विभागाच्या दोन सह अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले गेले त्याच अहवालात कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनाही दोषी ठरविण्यात आले आहे. मग त्यांना का वाचविले? एकाच गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांना शिक्षा देतांना वेगळा मापदंड प्रधान सचिवांनी का लावला?
दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्या कडून चौकशी अहवाल वेळेत का सादर केला जात नाही? चामलवार यांच्या वर कुणाचा दबाव आहे का?यासारखे प्रश्‍न आ. चरणभाऊ वाघमारे यांनी बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह त्यांच्या दालनात सुमारे एक तास झालेल्या चर्चे दरम्यान उपस्थित केले. यावेळी आ. वाघमारे यांचे रौद्र रूप आणि ठाम भुमिका पाहून प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी तात्काळ अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना दुरध्वनीवरून दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्वाणीचे आदेश दिले आहेत. 


- आ.चरण भाऊ वाघमारे व आशीषकुमार सिंह यांच्यात सुमारे 1 तास चर्चा झाली. चर्चे दरम्यान आमदार वाघमारे यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. अरविंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या दि 5/10/2017 रोजी अहवालावर आपण शाखा अभियंता, उप अभियंता, यांना निलंबित केले. कार्यकारी अभियंता यांना वाचविले. 

- अहवालात तिघेही दोषी असतांना वाळके यांना वेगळा न्याय कसा? मनोरा आमदार निवास इमारत पाडल्या नंतर चामलवार अहवाल देणार आहेत काय? 
मनोरा इमारत पाडून अपहाराचे पुरावे नष्ट करायचे आहेत का? विलंबाची कारणे काय आहेत? चामलवार यांच्याशी काल झालेल्या भेटीत ते प्रचंड दबाखाली काम करत असल्याचे जाणवले. असे आ. चरणभाऊ वाघमारे यांनी प्रधान सचिवांच्या निदर्शानास आणून दिले.
- अधिक्षक अभियंता चामलवार यांचा अहवाल येत नाही तो पर्यत मी आपल्या दालनातून बाहेर जाणार नाही. आ.चरणभाऊ वाघमारे यांची ही कठोर भुमिका पाहून प्रधान सचिवांनी तात्काळ चामलवार यांना आदेशीत केले.
- चौकशी अधिकारी(अरविंद सूर्यवंशी, व चामलवार) या दोघांचा अहवाल रजिस्टर करा. ज्यायोगे न्यायालयात मनोरा आमदार निवास प्रकरणी दोषी अभियंत्यांवर दोषारोप सिध्द होण्यास मदत होईल. प्रधान सचिवांनी आ. वाघमारे यांची ही विनंतीही मान्य केली. या वेळी सामाजिक कार्यकते राजू खरे उपस्थित होते.