आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
यात ६ खातेदरांची सर्व मिळून सुमारे २९ लाख ९९ हजार ३३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यात शेवाळेसह उपाध्यक्ष शंकरराव धुमाळ आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी महादेव देवराव भाबड (रा. कारेगाव, ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली.
पाथर्डी शहरातील श्रीनाथ मल्टिस्टेट सोसायटीच्या पाथर्डी शाखेत सुमारे ७ वर्षांपासून भाबड यांनी शेती आणि वकिलीच्या उत्पन्नातून मोठी बचत केली होती. मुलाचे शिक्षण, घर बांधकाम, लग्नकार्य आदींसाठी सुमारे ३ लाख रुपयांच्या मुदतठेव पावत्या आणि चालू खात्यावर ३ लाख ५० हजार ३३५ रुपये अशी ६ लाख ५० हजार रक्कम या शाखेत जमा केली. मात्र ठेवीच्या पावत्यांची मुदत संपल्यानंतर आणि पैशांची आवश्यकता भासल्यावर वेळोवेळी ठेवीच्या पैशांची मागणी केली. मात्र शाखेचे व्यवस्थापक एकनाथ नवनाथ ठोंबरे यांनी भाबड याना सांगितले, की ‘तुमचे व इतर खातेदारांचे ठेवी आणि चालू खात्याच्या रक्कमा शाखेचे अध्यक्ष पोपट एकनाथ शेवाळे हे घेऊन गेले आहेत. त्यानंतर सदरील शाखेच्या नगर येथील मुख्य कार्यालयात जाऊन चौकशी केली. परंतु शेवाळे यांनी पैशांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘संबंधित शाखेचे कार्यलय बंद झालेले आहे. तुम्हाला कोणतीही रक्कम मिळणार नाही. पुन्हा पैसे मागण्यासाठी येऊ नका, भाबड यांना असे सांगण्यात आले.
दरम्यान, शाखेचे इतर खातेदार साहेबराव आव्हाड यांचे ५ लाख २० हजार रुपये, नीता दिपक काबाडी यांचे ६९ हजार रुपये, शिवराज पालवे यांचे ८ लाख ६० हजार रुपये आणि सागर बाहेती, आणि दैनिक बचत प्रतिनिधी अशोक वाखुरे यांचे वैयक्तिक खात्यावरील दिड लाख व दैनिक बचतीचे ६ लाख रुपये यांचे दीड लाख अशी २९ लाख ९९ हजार ३३५ रुपयांच्या रक्कमेचा अपहार करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी शाखेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळामधील दत्तात्रय गीते, बापू डोंगरे, रावसाहेब चोथे, चंद्रभान काळे, सुभाष डोंगरे, जनार्धन आंधळे, पोपट घोलप, सुमन डोंगरे, आबासाहेब आंबेडकर, व्यवस्थापक बबन डोंगरे, जनरल मॅनेजर अशोक मेघडंबर व पाथर्डी शाखेचे मॅनेजर एकनाथ ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर हे करत आहे.