Breaking News

घोडेगाव-शिंगणापूर रस्त्यावर अद्यापही धूळ

नेवासा : घोडेगावहून शिंगणापूरकडे जात असलेल्या तीन किलोमीटर रस्त्यावर अद्यापही प्रचंड धूळ उडत आहे. या रस्त्याचे काम ठेकेदाराने अगदी कासवाच्या गतीने चालविले आहे, सुरुवातीला खडी आणि मुरूम टाकण्यात आल्यानंतर कित्येक दिवस या रस्त्याचे काम राखडले होते. त्यांनतर हळूहळू मुरूम टाकून रस्ता रोलरने दाबण्यात आला.



मात्र या रस्त्यावर दोन ठिकाणी जलवाहिनी गेल्याने रस्त्याचे काम पुन्हा रखडले. सध्या या रस्त्याचे काम खूपच मंद गतीने सुरु आहे. परिणामी या रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीचा स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे शिंगणापूरवासियांमध्ये घशाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे सदर ठेकेदाराने काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान, सोनई-कांगोणी रस्त्यावर ठेकेदाराने केवळ मोठी आणि बारीक खडी टाकून ठेवली आहे. यामुळे दुचाकी वाहनांचे छोटे मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याचे काम केव्हा सुरु होणार, अशी विचारणा या परिसरातील रहिवाशांमधून केली जात आहे.