Breaking News

निवडणुका अगोदर तुकाई चारी प्रश्न मार्गी लागेल का?


मिरजगांव /वार्ताहर/-मिरजगांव जिल्हा परिषद गटातील तुकाईचारीचा प्रलंबित प्रश्न पालकमंत्र्यांना अडचणी निर्माण करणार का? निवडणुकीच्या गर्तेत अडकलेल्या तुकाईचारीच्या प्रश्नाला काही केल्याने उत्तर सापडत नाही. तुकाईचारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
हा लढा मागील २५ वर्षांपासून अविरत सुरु आहे. त्यासाठी अनेकवेळा मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले, व पायऱ्या झिजवण्यात आल्या. कॉंग्रेसने या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाकारले. तर भाजपाने चांगलेच खेळवले अशी म्हणण्याची वेळ तुकाईचारी लाभक्षेत्रातील २१ गावांवर आली आहे. त्यामुळे तुकाईचारी संबधी असणारी नाराजी पालकमंत्री राम शिंदे यांना नक्कीच भोवणार आहे. असे तुकाईचारी लाभक्षेत्रातील मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुकाई चारी मोठी अडचणीची ठरणार आहे.

तुकाईचारी साठी आजवर अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. अनेक मोर्चे निघाले. यामध्ये प्रत्येकवेळी राजकर्त्यांनी गोडगोड आश्वासने दिली गेली. यामध्ये शासकीय पातळीवर कधी सर्व्हे झाला तर कधी मोजणी झाली. त्यातच भर म्हणून स्थानिक लोकांनी पदरमोड करून दोनवेळा सर्व्हे करण्यात आला. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांना हरताळ फासून केलेल्या सर्व्हेला कोणती ना कोणती कारणे दाखवून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यात नेहमीच शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने राजकीय नेत्यांनी स्थानिक लोकांची नेहमीच दिशाभूल केली आहे. असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. कारण तुकाईचारी लाभक्षेत्रातील सर्वच्या सर्व २१ गावे दुष्काळी गावे आहेत. दुष्काळी गावांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आहे. त्यामुळे या गावांतील जनतेत असंतोष खदखदत आहे. हा असंतोष जिल्हा परिषद निवडणुकीत एकदा दिसलेला आहे. कारण तालुक्यातील दुष्काळी भागातील मिरजगाव परिसरातील दुष्काळी गावांनी भाजपाला माती चारून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले आहे. ही गोष्ट फार जुनी नाही. हे सत्ताधारी भाजपाने वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे. 

तुकाईचारी लाभक्षेत्रात कोंभळी, खांडवी, मुळेवाडी, थेरगाव, नागमठाण, कोकणगाव, रवळगाव, रमजानचिंचोली, वालवड, चांदे.बुद्रुक, चांदेखुर्द, गुरवपिंप्री, चिंचोलीकाळदात, डिकसळ, चिंचोलीकाळदात, चिंचोली फाटा, टाकळी खंडेश्वरी, बहिरोबावाडी, यासह इतर गावांना त्याचा लाभ होणार आहे. वास्तविक ही सर्व गावे अतिशय दुष्काळी आहेत. या गावांना उन्हाळ्यात नेहमीच टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी शासनाला दरवर्षीच लाखो रुपये खर्च करावे लागतात. तसेच या सर्व गावांतील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे ही शेती पूर्णपणे नुकसानीत आहे. तर याभागातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी आहे. त्यामुळे याभागासाठी तुकाईचारी हाच एकमेव पर्याय आहे. मात्र याच तुकाईचारीचे घोंगडे कित्येक वर्षांपासून भिजत पडलेले आहे. त्याला कोणीच भगीरथ पुढे येताना दिसत नाही. मात्र स्थानिक नागरिकांचा हा लढा अविरत सुरूच आहे.

विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री राम शिंदे यांनी आपण निवडून येताच तुकाईचारीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावू असे अश्वासन देवून ही निवडणूक लढविली त्याबद्दल कर्जत तालुक्याबरोबरच या २१ गावातील मतदारांनी राम शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. त्यानंतर आमदार राम शिंदे राज्याचे मंत्री झाले नंतरच्या काळात जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. मात्र तुकाईचारी संबधी कोणतीच हालचाल करण्यात येत नव्हती. त्यानंतर मात्र बाळासाहेब सूर्यवंशी या वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरवपिंप्री येथे आठ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी मंत्रालयात तुकाईचारी साठी मिटिंग लावली. मात्र या मिटिंगमध्ये तुकाईचारी कश्याचप्रकारे होऊ शकत नसल्याचे संकेत शासकीय अधिकाऱ्यांनी दिले व यात तुकाईचारी संघर्ष समितीच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला. यामध्ये तुकाईचारी संघर्ष समितीच्या नेत्यांचा नाद मिटविण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. असा आरोप तुकाईचारी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

कर्जत तालुक्यातील कोणताच प्रश्न सहजासहजी सुटत नाही. हा येथील नागरिकांचा अनुभव आहे. त्यासाठी तुकाईचारी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये सुनील टकलेसर, बापूसाहेब काळदाते, सतीश लाघुडे, विष्णुपंत टकले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, डॉ. रामदास टकले, नंदकुमार नवले, यांच्यासह इतर अनेक तरुण कार्यकर्ते या समितीमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये लोकवर्गणी करून हे आंदोलन लढण्यात येत आहे. या समितीने आजवर अनेकदा अंदोलने करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कर्जत तहशील कार्यालयात सत्यनारायण घालून केलेले आंदोलन चांगलेच गाजले आहे. पुढील काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती संघर्ष समितीकडून देण्यात येत आहे. 

पालकमंत्री राम शिंदे यांनीही तुकाई चारीचा प्रश्न सोडविण्याचे मनावर घेतलेले चित्र दिसत आहे. त्यांनी मंत्रालयात त्यासंबधी बैठक घेतल्याची व त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, संपतराव बावडकर, बळीराम यादव, अंकुश टकले, हरिश्चंद्र टकले, सागर मांढरे, निलेश सूर्यवंशी, युवराज टकले, शेखर पवार, गणेश टकले, जयेश सूर्यवंशी, यांनी तुकाईचारी भागाची पाहणी करतानाचा त्यांचा फोटो सोशल मिडीयावर नुकताच सध्या झळकत आहे. यामधून जर खरोखरच २५ वर्षांपासून भिजत पडल्या तुकाई चारीचा प्रश्न मार्गी लागला. तर खरोखरच आशादायी चित्र आहे असे म्हणावे लागले. अन्यथा सर्व काही राजकारणासाठीच आहे. असे म्हणावे लागले.