Breaking News

पथदिव्याच्या कामात 34 लाखांचा अपहार तोफखाना ठाण्यात आयुक्तांचा ‘चौकार’

मनपा आयुक्तांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल कामे न करता बिले अदा केल्याचा ठपका.


अहमदनगर/प्रतिनिधी। महापालिकेच्या बहुचर्चित पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका आयुक्तांनी आपल्याच सहकार्‍यांनी टाकलेल्या चेंडूवर ‘चौकार’ लगावला आहे. महापालिकेतील चौघांना आरोपींच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. आयुक्तांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये अजूनही काही जणांवर गुन्हा दाखल होण्याचे चिन्हे दिसत आहे. 

पथदिव्यांच्या घोटाळ्या प्रकरणी सोमवारी सुमारे 28 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्तांनी फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथदिव्याप्रकरणी आज चौघांवर तोफखाना पोलिसामधे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे चौकशी करुन लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तोफखान्याचे पोलिस निरिक्षक सुरेश सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गेल्या 28 दिवसांपासून पथदिव्यांचा विषयावर चर्चा करण्यात आली होती. स्थायीच्या सभेत हा प्रकार विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी हा प्रकार उघडकीस आनला होता. यानंतर महानगरपालिकेतील सभाही चांगलीच गाजली होती. यानंतर चौकशी आणि अहवाल यामध्ये हे प्रकरण अडकले होते. मात्र आज आयुक्तांनी फि र्याद दिल्याने या प्रकराणाला जरी पुर्णविराम बसला असला तरी आता या प्रकरणात आणखी कोण दोषी आहेत याची चौकशी सुरु होणार आहे. तसेच उपायुक्त दर्जाचे अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरवा करणार असल्याचे आयुक्तांनी बोलताना सांगितले आहे. यावरुन या प्रकरणात आणखी किती दोषी आहेत हे लवकरच उजेडात येईल.

पोलिस अहवालात 34 लाखांचा उजेड
महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदिव्यांच्या कामात 34 लाख 56 हजार 441 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालानंतर आता उजेडात आले आहे. हा अपहार महापालिकेच्या स्थायी समितीत उघड झाला होता. त्यानंतर 30 डिसेंबरला झालेल्या महासभेत या प्रकरणावरुन चांगलेच वादंग निर्माण झाले होते. यातून अधिकारी आणि पदाधिकारी असा वादही रंगला होता. परंतु आज चौघांवर गुन्हा दाखल करुन तात्पुरता का होईना या प्रकरणाला पुर्णविराम मिळाला असल्याचे चित्र आहे.

प्रभाग अधिकार्‍यांची चौकशी होणार
महानगरपालिकेत पथदव्याप्रकरणी झालेल्या अपहारा संदर्भात आता आयुक्तांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास तोफखान्याचे पोलिस निरिक्षक करत आहेत. पोलिसांनी आज अहवाल पोलिस अधिक्षक आणि महारपालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. यानंतर आयुक्तांच्या फि र्यादीवरुन गुन्हा दाखल केला असुन वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आता हलचाली सुरु झाल्या आहेत. तसेच या प्रकरणात प्रभाग अधिकार्‍यांची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे.

सकाळी सपकाळे मनपात तर दुपारी आयुक्त पोलिस ठाण्यात

सोमवारी सकाळी तोफखान्याचे पोलिस निरिक्षीक सुरेश सपकाळे यांनी पोलिस अधिक्षक आणि मनपा आयुक्त यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केला. यानंतर सकाळी पोलिसांनी मनपात हजेरी लावल्यानंतर दुपारी 1.40 च्या दरम्यान, आयुक्त घनश्याम मंगळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली यानंतर त्यांनी दुपारी 4.00 च्या दरम्यान गुन्हा चौघांवर दाखल केला आहे. यामधुन सकाळी पोलिस निरीक्षकांनी मनपाला भेट दिली तर दुपारी आयुक्तांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

फाईलींचे पुढे काय ?
महानगरपालिकेतील पथदिवे घोटाळा गेल्या पंचवीस तिस दिवसांपासून सुरु असून यातील ओरीजन फाईल्स कोणी नेल्या, कोठे आहेत, कोणाकडे होत्या आदी प्रश्‍न अद्यापही प्रलंबीत आहेत. ठेकेदार लोटके यांनी या फाईल कोणाकडे असते असे पोलिसांना सांगीतले असल्याची चर्चा असल्याने आता नेमक्या या फाईल्स कोणाकडे असतात आणि त्यावर केलेल्या सह्या कोणी हा प्रश्‍न तसा प्रलंबीत असून लवकरच या प्रश्‍नांचा उलगडा होणार आहे.

गुन्हा दाखल करा - काँग्रेसचा रास्तारोको
पथदिव्याप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने आज सकाळी काँग्रेसच्यावतीने मनपाच्या पथदिवे घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मनपासमोर औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यामध्ये काँग्र्रेसचे बाळासाहेब भुजबळ, गौरव ढोणे, शाम वाघस्कर, नलिनी गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होती.

आयुक्तांवर गुन्हा दाखल करा : मनसे
मनपाने पैशांचा अपहार केल्या प्रकरणी तसेच अहमदनगर मनपाचे अंदोज 34 लाख 65 हजार 441 लाखांची आर्थिक फवणुक, कट कारस्थान रचुन, संगनमताने, बनावट कागदपत्रे, बिले तयार करुन जनतेच्या पैशाचा अपहार केल्या प्रकरणी अत्यंत गंभीर स्वरुपाचा फौजदारी गुन्हा केल्या प्रकरणी आयुक्तांसह इतर 11 जणांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सचिन डफळ, गिरीष जाधव, नितीन भुतारे यांनी केली आहे.

या कलमान्वये तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

मनपाचे आयुक्त यांनी अपहार झाल्याचे कबुल करत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सचिन सुरेश लोटके, रोहिदास गजानन सातपुते, बाळासाहेब चंद्रकांत सावळे, भरत काळे आदींचा समावेश आहे. तर आयुक्तांच्या फि र्यादीनुसर 420, 406, 467, 468, 201, 471, 409, 120 (ब) अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये पुरावा नष्ट करणे, सार्वजनिक कट रचुन अपहार करणे, फसवणूक करणे आदींसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.