Breaking News

पन्हाळा नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना पुढील 6 महिने मजिप्राने चालवावी - सदाभाऊ खोत


पन्हाळा नगरपरिषदेची नळ पाणीपुरवठा योजना पुढील 6 महिने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी. योजनेला येणाऱ्या विजेच्या देयकातील 25 टक्के रक्कम नगरपरिषदेने द्यावी; तसेच योजना चालविण्यासाठी 8 कर्मचारी प्राधिकरणाला उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
पन्हाळा नगरपरिषदेची (जि. कोल्हापूर) नळ पाणीपुरवठा योजना, दौण्ड तालुक्यातील (जि. पुणे) सोनवडी, नानवीज व गार या गावांसाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, पिंपळनेर (ता. साक्री जि. धुळे) गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने श्री. खोत यांनी आज बैठक घेतली. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे (म.जि.प्रा.) सदस्य सचिव संतोष कुमार, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, म.जि.प्रा., पुणे च्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए.बी. चाटे, म.जि.प्रा. जळगावचे कार्यकारी अभियंता श्री. निकम, तीनही गावांचे सरपंच उपस्थित होते.