Breaking News

बालकलाकारांच्या संगीतबद्ध स्वरांनी पाथर्डीकर झाले मंत्रमुग्ध


पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/- पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या श्री विवेकानंद विद्या मंदिर मध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच झी टीव्ही युवा मराठी फेम व कलर हिंदी सनराइज स्टार फेम बालकलाकार चैतन्य देवढे व सोहम गोराने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम 'उडान २०१८' निमित्त बहारदार, समाजप्रबोधनपर नृत्य, नाटिका, विविध राज्यातील लोकनृत्ये, सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे खजिनदार अँड शिवाजीराव आठरे पाटील होते, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अँड सुरेशराव आव्हाड, सदस्यां कविताताई आव्हाड, नगरसेवक प्रसाद आव्हाड, महावीर मुनोत, सुनीलशेठ साखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, माजी मुख्याध्यापक अरविंद परगावकर, महादेव शिरसाट, श्री विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अशपाक सय्यद, पर्यवेक्षक गणपत नाथन आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वर्षभरामध्ये विविध परीक्षेमध्ये तसेच गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये व क्रीडा स्पर्धेमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण प्रसंगी बालकलाकार चैतन्य देवढे व सोहम गोराने यांनी मराठी चित्रपटातील विविध गीत सादर करून पालक, विद्यार्थी, व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

तसेच चैतन्य देवढे या बाल कलाकाराने सर्व विद्यार्थ्यांना अनेक टिप्स देताना विद्यार्थी दशेत खूप अभ्यास करावा व त्यासोबत आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना नेहमीच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर करावे, तसेच पालकांना आग्रही धरून त्यातच करिअर करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. कार्यक्रमाच्या शेवटी सैराट चित्रपटातील गाण्यावर सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला.