Breaking News

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे दिमाखदार सादरीकरण राजपथावर रंगीत तालीम


इंडिया गेट समोरील राजपथावर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्‍या पथ संचलनाची पूर्व तयारी म्हणून रंगीत तालीम करण्यात आली. देशाची शस्त्रसज्जता, प्रगती आणि वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शनच या निमित्ताने दिसून आले. महाराष्ट्राच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दर्शविणाऱ्‍या चित्ररथाचे दमदार सादरीकरणही झाले.
यावर्षी ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त १० आशियान देशांचे राष्ट्राध्यक्ष राजपथावरील पथसंचलनासाठी खास पाहुणे असणार आहेत. त्यानिमित्त यावर्षीच्या पथसंचलनात आशियान देशाला प्राधान्य देण्यात आल्याचे आजच्या रिहर्सलमध्ये दिसून आले. पथसंचलनाची सुरुवात १० आशियान देशांचे झेंडे उंचावणाऱ्‍या भारतीय सैनिकांच्या आकर्षक मार्चने झाली. केंद्रीय मंत्रालयांच्यावतीने प्रदर्शीत करण्यात आलेल्या एकूण ९ पैकी २ चित्ररथ हे विदेश मंत्रालयाचे होते. या चित्ररथांमध्ये आशियान देशांसोबत भारताचे शिक्षण, व्यापार, धर्म आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध दर्शविण्यात आले. तसेच, भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग पासमध्ये हेलीकॉप्टर्स वर भारतीय तिरंग्यासोबत तीन सेनादलांचे झेंडे आणि आशियान देशांचे झेंडेही फडकताना दिसले.