Breaking News

राक्षसी नरडींना अखेर फासच सोनई हत्याकांडातील 6 जणांना फाशीची शिक्षा

अहमदनगर : सहा वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित नेवासा तालुक्यातील सोनई येथे प्रेमप्रकरणातून दलित समाजातील तीन युवकांचा सवर्ण वर्गातील आरोपींनी अतिशय निर्घृणपणे खून केल्याच्या प्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 आरोपींना शनिवारी रोजी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोषमुक्त केले आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली होती. मेहेतर समाजातील तीन युवकांचा खून करण्याची घटना सोनई जवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठल वाडी येथे 1 जानेवारी 2013 रोजी घडली होती.


प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुर्हे या सहा जणांना न्यायालयाने फांशीची शिक्षा सुनावली आहे. अशोक फलके या एका आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याने न्यायालया ने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. सचिन सोहनलाल घारू(वय 23), संदीप राजू धनवार (वय 24) व राहुल कंडारे(वय 26 तिघे राहणार गणेशवाडी, सोनई, तालुका नेवासा)अशी खून झालेल्या तीन दलित युवकांची नावे आहेत. नेवासा फाटा येथील त्रिमुर्ति पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेमध्ये सचिन घारू, संदीप धनवार व राहुल कंडारे हे तीन युवक सफाई कामगार म्हणून कामाला होते. सोनईच्या गणेशवाडी परिसरातील एका सवर्ण वर्गातील मुलीबरोबर सचिन घारू याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या घरच्या लोकांना समजली होती. त्यांचा या प्रेमसंबंधला तीव्र विरोध होता. त्यामुळे त्याला संपविण्याच्या हेतूने मुलीच्या कुटुंबियांनी घरातील स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे. असा बहाणा करून 1 जानेवारी 2013 रोजी तिघांना घरी बोलावले होते. त्यावेळी आरोपींनी सचिन घारू याचा खून करून घास(जनावरांचा चारा)कापण्याच्या आडकित्याने त्याच्या शरिराचे तुकडे तुकडे करून जवळच असलेल्या एका कूपनलिकेत टाकले होते. तसेच संदीप धनवार व राहुल कंडारे या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले याच्या कोरड्या विहिरीत पुरून टाकले होते. वास्तविक या खून प्रकरणात दरंदले यांच्या कुटुंबातील महिलांचा देखील समावेश असल्याचा आरोप मृत सचिन घारू याच्या आईने केली होती. मात्र राजकीय दबावापोटी पोलीसांनी ही तक्रारच रेकॉर्डवर घेतली नाही. असा आरोप नातेवाईकांनी केला होता.

या प्रकरणाच्या तपासाबाबत राजकीय हस्तक्षेपामुळे तपासा बाबत पोलीसांची भूमिका संशयाच्या फेर्‍यात सापडली होती. पोलीसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्युचा व तीन दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खुनाच्या घटने नंतर तब्बल 5 दिवसांनी पोलीसांनी दलित अत्याचार विरोधी कायद्यानुसार(अ‍ॅट्रासिटी) गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे दलित संघटनांनी पोलीसांच्या तपासाविषयी शंका घेतल्याने अखेरीस हा या तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपविण्यात आला होता. एकूणच या प्रकरणात साक्षीपुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असल्याने प्रकरणाची सुनावणी नाशिक अथवा जळगाव जिल्ह्यात करावी अशी विनंती करणारी याचिका मृताच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.सुनावणी नंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात करण्याचा आदेश दिला होता. सरकारच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांची सरकारने नियुक्ती केली होती.

न्यायालयात सरकार पक्ष व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी न्यायालयाने सात पैकी 6 आरोपी दोषी असल्याचे व एक आरोपी निर्दोष असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर 18 जानेवारी रोजी दोन्ही बाजुच्या वकीलांनी शिक्षेबाबत युक्ती वाद केला होता. यावेळी आरोपीच्या वकीलांनी आरोपींचे वय व त्यांची गुन्हेगारी नसल्याची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयास केली होती.त्यावेळी सर्व आरोपींनी केलेले कृत्य खूपच गंभीर असल्याने 6 आरोपींना फांशीचीच शिक्षा देण्याची विनंती अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांनी केली होती. त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात या प्रकरणाच्या निकालाविषयी मोठी उत्सुकता होती.

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकारच्या वतीने अ‍ॅड.उज्ज्वल निकम व आरोपींच्या वतीने अ‍ॅड.रविंद्र चौधरी, अ‍ॅड.अविनाश भिडे व अ‍ॅड. कासलीवाल यांनी बाजू मांडली आहे. या प्रकरणात सरकारच्या वतीने एकूण 53 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सचिन घारू याचे ज्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते त्या मुलीची साक्ष महत्वाची होती. मात्र न्यायालयात सुनावणीच्या वेळी सर तपासणी व उलट तपासणी दरम्यान ही मुलगी काहीच बोलली नाही. त्यामुळे तिला फितुर साक्षीदार घोषित करण्यात आले होतेे.

या सहा आरोपींना फाशी 1-प्रकाश विश्‍वनाथ दरंदले
2-रमेश विश्‍वनाथ दरंदले
3-पोपट विश्‍वनाथ दरंदले
4-गणेश पोपट दरंदले
5-अशोक नवगिरे
6-संदीप कुर्‍हे