Breaking News

निवृत्त स.पो. निरीक्षकाच्या बंद घरातून 3 लाखांचे दागिने लंपास


सोलापूर, दि. 20, जानेवारी - निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक बजरंग कदम यांच्या बाळे येथील बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. बाळे येथील राजेश्‍वरी नगर येथील ब्लॉक नंबर 8 हे घर बंद होते. संधी साधून अज्ञात चोराने घरातील 3,17,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत फौजदार चावडी पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बजरंग श्रीरंग कदम (वय 62) हे आपल्या पत्नीसह बाळे येथील राजेश्‍वरी नगर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा नोकरीसाठी बाहेर आहे तर मुलगी विवाहित आहे. मुलगी सोलापुरातच आहे. मुलीला भेटण्यासाठी म्हणून हे पती- पत्नी गेले होते. त्यामुळे बंद घराची संधी साधत अज्ञात चोराने घरासमोरील लाकडी शिडीवरून घरात प्रवेश केला. घराचा मागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून दीड हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा 3,17,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 17 जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत बजरंग कदम यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी गुन्हे शाखा आणि फौजदार चावडी येथील पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर हे करीत आहेत.