Breaking News

मोबाईल सीसीटीव्हीवर चोर पाहिला, 15 मिनिटांत अटक

सोलापूर,  - कुर्डुवाडी रोडवरती असलेल्या कापड दुकानात चोरीसाठी गेलेल्या चोराला सीसीटीव्हीत कैद झाल्याने त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना पहाटे चार वाजता घडली. आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. कुर्डुवाडी रोडवर राधाई कलेक्शन आणि एच. यू. गुगळे यांचे मेन्स वेअर कापड दुकान आहे. पहाटे चार वाजता रोहिदास किसन वजाळे (वय 35, रा. कन्हेरगाव, ता. माढा) याने दुकानाच्या पाठीमागील भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. 


दुकानातील चेंजिंग रूमचा लाकडी दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दुकानाचे मालक संतोष दगडू नाळे यांचा मोबाइलवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांना फोनवर निरोप दिला. त्यांनी तातडीने दुकानात जाऊन वजाळे याला रंगेहाथ पकडले. नाळे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर आरोपीस माढा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. टेंभुर्णीत अनेक चोर्‍या झाल्या. परंतु त्याचा उलगडा झाला नव्हता. आता तपासात मदत होणार असल्याचे पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी सांगितले.