Breaking News

राजकीय संरक्षणामुळेच 135 कोटींचा जमीन घोटाळा,भाजप आमदार अनिल गोटे यांचा सरकारला घरचा आहेर.

मुंबई : धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी धुळ्याचे पालकमंत्री मंत्री जयकुमार रावळ यांच्यावरील आरोपांबाबत भाजप आमदार अनिल गोटे यांनी सूचक विधान केले आहे. आग असल्याशिवाय धूर निघत नाही, असे अनिल गोटे यांनी म्हटल्यामुळे राजकीय वतूर्ळात खळबळ उडाली असून, त्यांचे हे विधान रावल यांचा भ्रष्टाचार उघड करणारे असल्याचे बोलले जात आहे. 

भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पानी पत्र लिहून धुळ्यातल्या जमीन घोटाळ्याबाबत माहिती दिली आहे. दलालांना राजकीय संरक्षण असल्याशिवाय जमीन घोटाळा शक्य नाही, असे म्हणत आमदार गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. मागच्या सरकारच्या वाईट गोष्टी आपण का घ्यायच्या? असा सवाल गोटे यांनी सरकारला विचारला. शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहण करताना शासनातील अधिकारी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारुन आपल्या दलालांमार्फत अक्षरश: लूट करत आहेत., असा आरोप अनिल गोटेंनी केला. त्याचसोबत, धुळे शहराजवळ असलेल्या सर्व्हे नंबर 501, 510 या शासकीय मालकीच्या जमिनी आपल्या स्वत:च्या मालकीच्या दाखवून 135 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा नाशिक विभागाचे आयुक्त महेश झगडे यांचा अहवाल पत्रकार परिषदेत सादर केला होता., असेही गोटेंनी म्हटले आहे. आता भाजप आमदार अनिल गोटेंनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

त्यामुळे आता सरकार काय पावलं उचलतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणार्‍या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.