Breaking News

अग्रलेख - शेतकर्‍यांची ससेहोलपट सुरूच...


शेतकर्‍यांच्या धोरणावर सातत्याने चर्चा झडत आहेत, मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना होतानां दिसत आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शासनाने विविध समित्या नेमल्या, सरकारकडे संबंधीत समित्यांनी दिलेत. काही वैयक्तिकरित्याही सामाजिक संस्था व व्यक्तींनी अहवाल दिलेत, त्यावर पर्यायही सुचविले. राज्य सरकारने जे अहवाल स्विकारले त्यावर उपाय योजले, पण बळीराजाच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकर्‍यांचे जीवनमान, कौटूंबिक जीवन, कौटूंबिक आर्थिक स्तर, शेती प्रकार, कौरडवाहू, अर्धबागायती, घरातील खर्च, वाढत्या महागाईचा शेती भांडवलावर होणारा बोझा आजारपाजारांवर वाढते खर्च, शेतकर्‍यांच्या कुटूंबातील पिढ्यानपिढ्यांचे दारिद्रय, कुटूंबात बेरोजगार मुलं, अडचणी अभावी शाळे पासून उच्च शिक्षणापासून, योग्य दिशा, मार्गदर्शनाच्या अभावाने दुरावलेले मुलं, पाल्य शेतीला जोडधंद्यांचा, प्रक्रीया उद्योगांचा अभाव, उत्पादनाधारित नसलेली कर्जव्यवस्था, नैसर्गिक आपत्तीत पिक नुकसानीचे वाढते प्रमाण विजेचे वाढते दर, अशा अनेक प्रश्‍नांच्या गुंत्यात अडकलेला शेतकरी वर्ग जो मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा कोरडवाहू क्षेत्रात आहे. शेतकरी आत्महत्यांवर अनेक तज्ञ, विद्वानांची अनेक वेळा चर्चा केल्या. माध्यमांनी सातत्याने लिहिले, दाखवले मात्र शेतकरी आत्महत्येचं मूळ शोधण्यात कुठेतरी राहून गेलं? याची सल आहे. बदलत्या काळात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीत कुठेतरी कोरडवाही शेतकरी विकासाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न खुजे पडताहेत. दोष मात्र दिला जातो, ज्याने शेतीचा बांधही पाहिला नाही, कधी नांगर हाकला नाही. असा तज्ञवर्ग जेव्हा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांबाबत नको ते बरळतो तेव्हा कुठेतरी शेतकरी दुखावला जातो. अनेक समित्यांनी अनेक अहवाल दिलेत, काहींनी शेतकर्‍यांना दोषच दिला. पी. साईनाथांनी केलेला अहवाल मात्र सरकारने आत्मसात का केला नाही? हाच प्रश्‍न सतावतो आहे. काहींनी शेतकर्‍यांची प्रेमप्रकरणे असतात, तरा काहींनी शेतकर्‍यांमध्ये व्यसनाधिनता असते, काहींनी शेतकर्‍यांच्या घरात लग्नाला मोठा खर्च होतो असे अनेकविध आरोप केलेत. तर काहींनी शेतकरी घेतलेले कर्ज शेतात खर्च न करता इतरत्र खर्च केले असेही अकलेचे तारे तोडले. शेतात राबणारा, मातीतून पिकलेलं बाजारात मातीमोल विकणारा शेतकरी समजून घेण्यापेक्षा त्यांच्यात दोष शोधण्याचे काम अनेकांनी केलं. म्हणतात ना, ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’ हे असं आहे जे जाणायला मन लागतं तेही संवेदनशील म्हणतात ना, जावा त्यांच्या गावां, हे सगळं जाणून घेण्यापेक्षा स्वतःला शेतकर्‍यांची पोरं समजून सत्तेत मशगुल मोठमोठ्या पदांवर, विद्यापीठांत पदव्या मिळवून ‘सगळं काही आम्हाला ठाव’ म्हणणारी मंडळी खूप झालीय. शेतीपुढील मुळ प्रश्‍न, अडचणी, शेतकर्‍यांचे कौटूंबिक, आर्थिक जीवन, निसर्गावर आधारित शेतील, शेतकर्‍याला पाण्यात पाहणार्‍या कर्ज देणार्‍या बँका, संस्था, सरकारी योजना व कृषी सवलतीपासून गरीब गरजू शेतकर्‍यांची होणारी विवंचना, शेतकर्‍यांसाठी माहिती मार्गदर्शन केंद्राचा अभाव, गावातील शिकलेल्या मुलांची शहराकडे असणारी ओढ, गावाकडे शिकलेल्यांचे दुर्लक्ष, तज्ञांचे कागदी आराखडे, भाषणे हे सर्व शेतातील मातीत राबणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात पेरायला मात्र कोणी त्याग करायला तयार नाही. जोपर्यंत गावाकडे शिक्षण, रोजगार, मार्गदर्शन, कर्जाचे समान वितरण, होणार नाही तोपर्यंत या बाजारबुणग्या परिस्थितून शेतकरी बाहेर येईल कसा? शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशलि विषयावर बोलतांना, लिहीतांना यातनेसोबत गाठ असावी लागते, शेतकरी उभा राहील पण त्यांची थट्टा थांबायला हवी, पिढ्यानपिढ्या ज्या शेतकर्‍यांनी एकुण सर्व समाजाला अन्न दिले तो राबराब राबला म्हणून आपल्या ताटात मिष्ठान्न नांदले याचे भान जोपर्यंत मानवाला येत नाही, जोपर्यंत जेवणाच्या ताटात कष्टणारा, राबणारा शेतकरी दिसत नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवणेसाठीच्या उपाययोजनांना उकल होणार नाही. केवळ शेतकर्‍यांमधील दोष काढण्यात काही मंडळी व्यस्त असतात. या सर्व मंडळींना उत्तरे ही तयार आहेत.सांगा ना कुठे कमी पडतो शेतकरी? शेतीकामात सतत राबणं आहे, पूर्वीचे दिवस बरे होते. तेव्हा कष्ट होते, जनावरं होती, जनावरांना चारा होता, कुरणे होती, शेतातलं पिकलं ते घरातील अन्नासाठी उपयोगी पडायचं. त्याकाळी आजसारखे तुकडे तुकडे शेतीचे नव्हते, जमिनीच्या वाटण्या होत होत आता अनेक शेतकरी जे पूर्वी 10 ते 15 एकरचे शेतकरी होते, ते जमिनी वाटल्याने एकर, बिगा जमिनी असलेले शेतकरी झालेत. या तुकड्यांच्या शेताला मिळून किती कर्ज मिळणार? त्यात कोरडवाहू शेती, एकरी 8 हजार कर्ज त्यात काय भागणार? मग नाईलाजाने सावकाराकडे, सोयर्‍यांकडे उसणवारी करणार? नैसर्गिक आपत्ती आल्यावर पेरलेलं मातीत जाणार, जर पिकलं तर ते उत्पादन खर्च वजा जाता हाती काय येणार? हाही प्रश्‍न आहेच. मग त्यातून दोन पैशावर पावसाचे 4 महिने जाऊन 8 महिने कसे जगायचे? त्यात घरातील मुलांची शिक्षणे शिक्षणांचा वाढीव खर्च, घरातील म्हातार्‍या आई वडिलांचे आजारपण, मुलांचे लग्न, पाल्यांमध्ये गुणवत्ता असूनही उच्च शिक्षणापासून पैशाअभावी विवंचना, कुटुंबातील कोणीही नोकरी, व्यवसायात नसणे अशा सर्व व्यापातून पावसाळ्याच्या पिक भांडवलासाठी शेतकरी काय काय करतो? या यातना जो भोगील, अनुभवीन तोच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांच्या मुळाला जाईल.शेतकर्‍यांच्या अन्य खर्चावर बोट ठेवणार्‍यांनी आधी आपल्या घरातील खर्चाबाबत स्वतःला प्रश्‍न केले पाहिजे. ‘आपलं ठेवायचं झाकून, दुसर्‍याचं पहायचं वाकून’ हे कुठेतरी थांबायला हवे. शेतकरी अनेक प्रश्‍नांनी झगडत जगत असतो. शेतीचा विकास करायचा तर पुर्वीची कर्जे फेडावी लागतात. कर्ज नसल्याचे दाखले लागतात, त्यात राष्ट्रीयकृत बँकेत गरजू शेतकर्‍यांना समजून घेण्यासाठी जाणकार अधिकार्‍यांची वाणवा दिसून येते, त्यात शेतीचे तुकडे झाल्यास बँक अधिकारी कर्ज देत नाही असे एनेक कारणे आहेत, शेतकर्‍यांच संपूर्ण कुटूंब शेतात राबतं, मजूरी वाढली, रासायनिक खते महागली, पशुधन कमी झालं, चारा, कुरणे कुठे राहिली? गोचरण राने बर्‍याच गावात पुढार्‍यांनी विकून खाल्ली. पशुधन नाही, त्यात शेती भांडवलाशिवाय राहिलीच नाही. मग भांडवली खर्च भागवता भागवता काबाडकष्टाचं चीज होईलच याची शाश्‍वती नाही. त्यात सततची नैसर्गिक आपत्ती बाजारभावाची शाश्‍वती नाही. अशा परिस्थिती कौटूंबिक खर्च कसा भागवायचा? शेतकर्‍यांच्या जीवनमानात, आर्थिक परिस्थिती, त्यांच्या कुटूंबातील पाल्यांच्या शिक्षणासाठी जोमाचे प्रयत्न केल्याशिवाय शेतकरी उभा राहिल कसा?