Breaking News

प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक प्रतिबंधक अभियानात 10 टन प्लास्टिक कच-याचे संकलन

नवी मुंबई, दि. 28, जानेवारी - नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत नेहमीच पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक अभियान मध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रात लोकप्रतिनिधींसह विविध स्वयंसेवी संस्था मंडळे, सोसायट्या, महिला मंडळे, बचत गट, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक जागरूकतेने सहभागी झाले होते. विविध शाळांमध्येही विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच काही शाळांमध्ये पालकांनीही सहभागी होत प्लास्टिक कचरा गोळा केला. 


संपूर्ण महापालिका क्षेत्रात एकूण 10 टनापेक्षा अधिक प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम ही एका दिवसापुरती नसून नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातूनच प्लास्टिकला हद्दपार करावयास पाहिजे याकरिता अधिक मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त म्हणजेच आरोग्यपूर्ण नवी मुंबईसाठी संपूर्ण सहयोग द्यावा असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कुठेही, कसेही फेकून दिलेले प्लास्टिक त्याचे लगेच विघटन होत नसल्याने वर्षानुवर्षे तेथेच पडून राहते, त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो, यादृष्टीने मानवी जीवनाच्या व भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी आजच निर्धार करून प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक मुक्त नवी मुंबई करण्यासाठी नियोजन केले असून यामध्ये प्रत्येक घटकाचा सहभाग घेतला जात आहे.प्लास्टिक हा पर्यावरणाचा व मानवी आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू असून हजारो वर्षे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून हद्दपार करणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने जनजागृती करीत असून आता महाराष्ट्र राज्यात शासनाच्या पर्यावरण विभागामार्फतही प्लास्टिक बंदी लागू करण्यात येत आहे. ठिकठिकाणाहून जमा करण्यात येणारा प्लास्टिक कचरा एकत्रितपणे संकलित करण्यात येऊन तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी त्यावर प्रक्रिया करण्यात येऊन प्लास्टिक ग्रॅन्युल्स तयार करण्यात येणार आहेत, ज्याचा उपयोग डांबरी रस्ते निर्मितीत कोटींगसाठी करण्यात येतो.