Breaking News

कार अपघातात तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर

अकोला,  कारंजा तालुक्यातील काजळेश्‍वर-खेर्डा मार्गावर असलेल्या उमा नदीच्या पुलानजीक कार उलटून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर कारमधील तीन लोक गंभीर जखमी झाल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. पार्थ मोहन आगे असे मृतक तरुणाचे नाव असून अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतिज किशोर भड आणि श्रेयस अभिजीत सुलताने असे तिघे जण यात गंभीर जखमी झालेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार काजळेश्‍वर येथील महादेव भड यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने भड यांच्या घरी आलेल्या काही पाहुण्यांपैकी अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड , श्रेयश अभिजित सुलताने आणि पार्थ मोहन आगे, हे चौघे मुलीला आणण्यासाठी एमएच-27, टी-132 क्रमांकाच्या कारने काजळेश्‍वर येथून कारंजाकडे येत होते. दरम्यान काजळेश्‍वरनजिक असलेल्या उमा नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार उलटली. या अपघातात पार्थ मोहन आगे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड, श्रेयश अभिजित सुलताने हे गंभीर जखमी झाले. या अपघातातील सर्व जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.