Breaking News

साईबाबा समाधी शताब्‍दी सोहळ्यानिमित्त शिर्डीत महारक्‍तदान शिबिर


शिर्डी प्रतिनिधी - साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने श्री साईबाबा समाधी शताब्‍दी सोहळ्यानिमित्त दि.३० रोजी शिर्डी येथील साईनगर मैदानावर महारक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. साई पालखी मंडळ, स्‍वयंसेवी संस्‍था, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि शिर्डी परिसरातील नागरिकांनी या महारक्‍तदान शिबिरात मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे. 
डॉ. हावरे म्‍हणाले, दिवसेंदिवस रक्‍ताची वाढती गरज लक्षात घेवून रक्‍तदान चळवळ वृधींगत होण्‍यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जसे तिरुपतीमध्‍ये केशदान तसेच शिर्डीमध्‍ये रक्‍तदान या धर्तीवर रक्‍तदान चळवळ उभी करण्‍याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे. त्‍यानुसार मे २०१७ पासून श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरात दररोज रक्‍तदान प्रकल्‍प सुरु करण्‍यात आलेले आहेत. राज्यातील विविध रक्तपेढ्यांना या उपक्रमाशी जोडलेले असून या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्‍णांना याचा फायदा होत आहे.

“रक्‍तदान हे जीवनदान” या उक्‍तीप्रमाणे सामाजिक बांधिलकीच्‍या जाणीवेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या महारक्‍तदान शिबिरात अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून सुमारे २५ नामांकित रक्‍तपेढ्यांना रक्‍त संकलनासाठी निमंत्रित करण्‍यात आलेले आहे. या निमित्‍ताने रक्‍तांची भासणारी कमतरता भरुन काढण्‍यास निश्चितच मदत होणार आहे. या महारक्‍तदान शिबीरामध्‍ये ऐच्छिक रक्‍तदात्‍यांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच देशातील सर्व साई मंदिरांनी ३० डिसेंबर रोजी आपल्‍या साई मंदिरात महारक्‍तदान शिबिराचे आयोजन करुन या रक्‍तदान कार्यात सहभागी व्‍हावे, असे आवाहनही डॉ. हावरे यांनी केले आहे.