Breaking News

पुढील २ वर्षात ५ लाख कृषिपंप सौरउर्जेवर आणणार

राज्यात तीन वर्षात ऊर्जा विभागाने साडेचार लाख शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन दिले आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा करायचा असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राज्यात सौरपंपांची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून पुढील २ वर्षात ५ लाख शेतकऱ्यांचे कृषिपंप सौरउर्जेवर आणण्यात येतील, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी विधानसभेत सांगितले. 


तसेच शेतकऱ्यांच्या २.१८ लाख नवीन वीज जोडण्या देताना प्रत्येकी १ किंवा २ शेतकऱ्यांमागे एक स्वतंत्र छोटा ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी घोषीत केले. नियम 293 अंतर्गत उपस्थित करण्यात आलेल्या सदस्यांच्या चर्चेत शेतीविषयक प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, 3 हजार 972 कोटी रुपयांची गुंतवणूक महापारेषणमध्ये करण्यात येत आहे. नांदेड, धारणी येथील 400 मेगावॉटचे केंद्र पूर्ण झाले आहेत. 67 उपकेंद्रे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. 3 वर्षात 15 हजार 890 मेगावॉट इतकी पारेषणची क्षमता झाली आहे. महापारेषणने आपली यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार केला आहे. त्यात 75 नवीन उपकेंद्र निर्माण करण्यात येणार असून 27 हजार 96 मेगावॅटने पारेषणची क्षमता वाढणार आहे. 

आणखी 7 हजार कोटी रुपये खर्च करून देशातील सर्वात मजबूत पारेषण कंपनी उभी करण्यात येणार आहे. 3 कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करणारी महावितरण ही सर्वात मोठी कंपनी आहे. ग्राहकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सर्वाना अपेक्षित असलेली महावितरण आणि महापारेषण कंपनी तयार करण्यासाठी 13 हजार 398 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच प्रभावी काम करण्यासाठी महावितरणमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे, ,असेही ऊर्जामंत्री म्हणाले.