Breaking News

त्या दोघांचे वारस कोण ? शिर्डी पोलिसांना पडलेला प्रश्न

शिर्डी/प्रतिनिधी - साईनगर रेल्वेस्टेशन परिसरात सुमारे दोन महिन्यांपूर्वी ३५ व ४५ या वयोगटातील दोन मृतदेह मिळून आले होते. या दोघांनी विषप्राशन करून जीवन संपविल्याचे तपासाअंती समजले. मात्र शिर्डीसह परराज्यात शोध घेऊनही तपास लागत नाही. त्यासाठी विविध पैलूवर तपास करण्यात आला. परंतु त्या दोन पुरुषांनी आपली जीवनयात्रा का संपवली, याचे गूढ शिर्डी पोलिसांना अद्यापही सापडले नाही. दरम्यान, या मृतदेहांची पटविण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन पो. नि. प्रताप इंगळे, पोलीस हेडकॉंस्टेबल रावसाहेब शिंदे यांनी केले आहे. शिर्डीत मात्र या घटनेची उत्कंठा आहे.

यातील एक मृतदेह ३५ वयाचा असून उंची पाच फूट, सावळा रंग, काळे केस, काळी पॅंट, राखाडी रंगाचा शर्ट त्याने घातला आहे. तर दुसऱ्याचे वय ४५ असून उंची पाच फूट, निळा शर्ट, विटकरी पॅंट, काळे केस अशी वेशभूषा या दोन्ही मृतदेहांची ओळख आहे. शिर्डीत आलेल्या ‘त्या’ दोघांनी एकाचवेळी जीवन का संपवले, त्याचा शोध लागावा म्हणून पोलिसांनी सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक केले. हाताचे ठसे घेऊन ‘आधार’च्या माध्यमातूनही तपास केला. डी. एन. ए. च्या माध्यमातून प्रयत्न केला. दात, मणके. हाडे आदी नमुने न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेकडे पाठविले. महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातही शोध घेतला. या मृतदेहांचे वारस का सापडत नाही, हा प्रश्न सध्या शिर्डी पोलिसांना पडला आहे. शिर्डी हे देवस्थान अर्थकारणाबरोबर रोजगार देणारे गाव आहे. अनेक भक्त साईबाबांचे दर्शन घेऊन पुण्य नशिबी बांधतात. मात्र वैतागलेले जीव कधी फाशी घेऊन तर कधी विषप्राशन करून ओळख पटणार नाही, याची काळजी घेत या जगाचा निरोप घेतात. अशावेळी अशा लोकांच्या वारसाचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. 

पोलीस खाते यंत्रणेमार्फत शोध घेतात. मात्र जास्त दिवस झाले, की पोलिसांनाही एकप्रकारे आव्हान वाटते. त्याचे शल्यही तपासी पोलिसांना व अधिकाऱ्यांना बोचत असते. त्याला शिर्डी पोलीस ही अपवाद नाही. याविषयी कोणाला काही माहिती असल्यास शिर्डी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.