Breaking News

तासिका पुर्ववत होण्यासाठी जिल्ह्यातील शाळांना आदेशित करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शारीरिक शिक्षण व कला विषयाच्या तासिका पुर्ववत करण्याबाबतचे जिल्ह्यातील शाळांना आदेशित करण्याच्या मागणीचे निवेदन क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जि.प. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामदास खेडकर यांना देण्यात आले. 

यावेळी राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य खजिनदार घनशाम सानप, माध्यमिक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, कला अध्यापक संघाचे सुनील दानवे, महेंद्र हिंगे, बाळासाहेब राजळे, सुभाष नरवडे, बाळासाहेब मुळे, सिताराम बोरुडे, रमाकांत दरेकर, बापूसाहेब जगताप, हरिश्‍चंद्र ढगे, महेश महांडुळे आदि उपस्थित होते.

दि.5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकान्वये अन्वये शारीरिक शिक्षण व कला विषयाच्या कमी झालेल्या तासिका पूर्ववत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक बदलण्यासाठी आपल्या कार्यालया मार्फत आदेश निर्गमीत होणे आवश्यक होते. तशा आशयाचे पत्र दि.3 नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. मात्र आपल्या कार्यालया मार्फत आदेश संबंधीत विद्यालयास न मिळाल्याने वेळापत्रकात बदल झाला नाही. त्यामुळे एक प्रकारे शासनाच्या आदेशाची ही पायमली होत असून, शारीरिक शिक्षण व कला शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तातडीने जिल्ह्यातील सर्व शाळांना वेळापत्रकात परिपत्रकाप्रमाणे बदल करण्याच्या सूचना निर्गमीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.